ब्रेकिंग
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

 

अमळनेर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंदिरातील लाकडी रचना तसेच ऑइल पेंट ने रंगरंगोटी केली असल्यामुळे आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीत ही आग लागली.

                घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दल, पालिका प्रशासन, पोलीस, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बोरी नदीच्या दोन्ही काठावर केलेल्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली अन्यथा सराफ बाजारातील अरुंद रस्त्यांमुळे मदत कार्य कठीण झाले असते.

                  दरम्यान आज सकाळी संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन हभप प्रसाद महाराज पंढरपूर कडे रवाना झाले होते. आग लागल्याची माहिती मिळूनही त्यांनी दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेनुसार वारी सुरूच ठेवली आहे.

              घटनास्थळी अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, डी वाय एस पी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, यांच्यासह प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन बंब व खाजगी पाण्याचे टँकरही मागविण्यात आले होते. आग विझविण्याचा कामात विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटना, हिंदू मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

               या भीषण आगीत संस्थानाचे मोठे नुकसान झाले असले तरी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती सुरक्षित राहिले आहेत. मंदिराचा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *