अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
अमळनेर :- शहरात पोलिसांनी दोन जुलै रोजी पहाटे मोठी कारवाई करत कोंबिंग ऑपरेशन राबवून वॉन्टेड आरोपी, गुटखा विक्रेते, गावठी दारू विक्रेते यांच्याविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत बारा वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली असून गावठी दारू गुटखा यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद ककाळीज, भगवान शिरसाट, कविता ठाणगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र वलाटे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत तीन आरसीपी पथके, अमळनेर डिबीचे 50 कर्मचारी, उपविभागातील 30 कर्मचारी, एलसीबी चे बारा कर्मचारी तसेच चोपडा येथील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पहाटे शाळेतील ते सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी 110 गुन्हेगारांच्या घरांची तपासणी केली त्यापैकी 70 गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आढळून आले. त्यातील 52 जणांची माहिती नोंदवून त्यांना ताकीद देण्यात आली. न्यायालयात गैरहजर असलेल्या सहा आरोपींना अटक वॉरंट बजावून ताब्यात घेण्यात आले तर बारा वॉन्टेड आरोपींनाही अटक करण्यात आली. तसेच फरशी रोड परिसरातील आकाश बाबुलाल सोनवणे (20) याच्याकडून वीस हजार रुपयांचा तर सिंधी कॉलनीतील सुगनामल किसनचंद बठे जा (75) याच्याकडून सुमारे 60 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
दरम्यान साने नगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, चांदणी कुऱ्हे, कंजरवाडा, पिंपळी, पैलाड या भागातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून सुमारे सव्वा लाख रुपयांची गावठी दारू व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच हातभट्ट्याही उध्वस्त करण्यात आल्या.
दरम्यान शहरात पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून शहरातील काही भागात सुरू असलेल्या अवैध धंदे, सट्टा मटका, यांच्यावरही कारवाई करून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


