ब्रेकिंग
अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर   आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा 

 

अमळनेर :- तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गडखांब – पातोंडा – धरणगाव या मार्गांच्या काँक्रिटीकरण आला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची मागणी केली जात होती.

        हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी च नाही तर उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या प्रकल्पामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शेतमालाची वाहने तसेच प्रवासी वाहतूक होत असते. हा रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर असून आता धरणगाव फाटा ते अमळनेर या महत्त्वाच्या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे – अमळनेर- चोपडा तसेच धरणगाव कडे जाणारा मार्ग अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  शेतकरी व उद्योजकांना होणार फायदा 

    अमळनेर आणि परिसरातील केळी, कापूस, मका, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण होणार आहे. शेतमाल बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांना वेळ व वाहतूक खर्च वाचणार आहे. तसेच दर्जेदार रस्त्यांमुळे या भागात औद्योगिक मालवाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना गती मिळून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सदर प्रकल्पाकडे उत्तर महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *