ब्रेकिंग
आरोप प्रत्यारोप पुरे झाले, आता कृती हवी! अमळनेरच्या पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करा: आम आदमी पार्टीची मागणी

 

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यापेक्षा तात्काळ सोडवून शहरातील सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची त्वरित स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे यांनी केली आहे.

शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या तळाशी साचलेला एक फुटाचा गाळ हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. “आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा पिण्याच्या पाण्याची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट करत, आपच्या कार्यकर्त्यांनी आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. टाक्या पूर्ण भरल्यावर त्यात मिसळणारा गाळ, क्षार आणि जंतू यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

प्रशासनासमोर ठोस उपाययोजनांची मागणी:

१. तात्काळ स्वच्छता: सर्व पाणी साठवणूक टाक्यांचे तांत्रिक ऑडिट करून त्यांची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी.

२. नियमित वेळापत्रक: वर्षातून एकदाच नव्हे, तर दर तीन महिन्यांनी नियमितपणे टाक्या स्वच्छ करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.

३. पारदर्शकता: ही स्वच्छता शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याची खात्री स्थानिक नागरिकांच्या समितीमार्फत करून घ्यावी.

आमचा निर्धार:

आम्हाला कोणावरही आरोप करण्यात रस नाही, तर जनतेला स्वच्छ पाणी मिळण्यात रस आहे. जर प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम पूर्ण केले, तर ते अमळनेरकरांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरेल. मात्र, यापुढेही केवळ कागदी घोडे नाचवून दुर्लक्ष केले, तर या प्रश्नासाठी कोणत्याही टोकाची भूमिका घ्यायला आम आदमी पार्टी मागे हटणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *