ब्रेकिंग
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण

 

अमळनेर | प्रतिनिधी

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सन्मान अभियान” अंतर्गत शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीपाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला.

शिबिरात उपविभागीय अधिकारी, मयूर भंगाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक, कोते तहसीलदार, रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती तसेच महसूल, ग्रामविकास, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, समाजकल्याण, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या समाधान शिबिरात महसूल, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांची जागेवरच सुनावणी करून अनेक प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर सेवानिवृत्त शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करणारे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *