ब्रेकिंग
रेल्वे स्थानकावर मानवतेचा महायज्ञ! ‘जैन सोशल ग्रुप’सह शहरातील सामाजिक संस्थांकडून अन्नछत्र; अडकलेल्या १२०० प्रवाशांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काहींचे मार्ग बदलण्यात आले, तर अनेक गाड्या अमळनेर रेल्वे स्थानकावरच तासन्‌तास खोळंबून राहिल्या. त्यामुळे हजारो प्रवासी अमळनेरमध्ये अडकून पडले. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी प्रवाशांसमोर अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

अशा संकटाच्या वेळी ‘जैन सोशल ग्रुप’ (JSG) आणि अमळनेर शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी एकत्र येत मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला. रेल्वे स्थानकावरच भव्य अन्नछत्राचे आयोजन करून अडकलेल्या प्रवाशांसाठी गरमागरम भोजन, नाश्ता, चहा, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपसोबत लायन्स क्लब, लायनेस क्लब, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, परिवर्तन ग्रुप आणि शहरातील इतर अनेक सामाजिक संस्थांनी खांद्याला खांदा लावून निस्वार्थ भावनेने काम केले. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी दिवसभर रेल्वे स्थानकावर थांबून प्रवाशांची सेवा केली.

याशिवाय अमळनेरमधील अनेक नागरिकांनीही आपापल्या परीने मोठे योगदान दिले. कोणी अन्नधान्य उपलब्ध करून दिले, कोणी वाहनांची व्यवस्था केली, तर अनेकांनी श्रमदान करून सेवा कार्यात सहभाग नोंदवला. संकटाच्या क्षणी संपूर्ण शहरच मदतीसाठी एकवटल्याचे प्रेरणादायी चित्र रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.

या अन्नछत्राचा लाभ सुमारे १,००० ते १,२०० प्रवाशांनी घेतला. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांची काळजी घेत त्यांच्यासाठी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे अनेक प्रवासी भावूक झाले. “अमळनेरकरांनी आम्हाला परक्या शहरातही घरच्यांसारखी माया दिली,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख, सचिव महावीर सिंघवी तसेच जैन सोशल ग्रुपचे सर्व सभासद सक्रियपणे सहभागी झाले होते. या मानवतावादी उपक्रमाची माहिती जैन सोशल ग्रुपचे पीआरओ कीर्तीकुमार कोठारी यांनी दिली.

संकटाच्या काळात जात, धर्म, पंथ आणि संघटनांच्या सीमा बाजूला ठेवत अमळनेरकरांनी दाखवलेली एकजूट, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, “माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म” हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *