ब्रेकिंग
सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी

‘लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण’ या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनाला यश

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील सहायक प्राध्यापक प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समाजकार्य विषयात यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन केली आहे.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी डॉ. एस. जी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या संशोधनाचा ऑनलाइन व्हायवा यशस्वीरीत्या पार पडला.

या परीक्षेसाठी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन (बिलासपूर) यांनी चेअरमन म्हणून तर प्रा. डॉ. प्रतिभा मिश्रा (बिलासपूर) यांनी बाह्य मूल्यमापक म्हणून सहभाग नोंदविला. संशोधन मार्गदर्शक डॉ. सुदाम राठोड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी “लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण” या समाजातील अत्यंत संवेदनशील, दुर्लक्षित आणि महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणारे हे संशोधन समाजकार्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेरचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, राज्यभरातील सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि स्नेहींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, समाजकार्य क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *