पुराच्या संकटात मानवतेचा हात! रोटरी क्लब अमळनेरकडून हजारो प्रवाशांना अन्नसेवा वापी विभागातील पुरामुळे मार्ग बदललेल्या पटना–बांद्रा एक्स्प्रेसमधील १२०० प्रवाशांना रेल्वे स्थानकावर दिला दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) : वापी विभागात आलेल्या भीषण पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्र. २९७२ पटना–बांद्रा एक्स्प्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत ट्रेनमधील सुमारे १००० ते १२०० प्रवाशांच्या जेवणाची तातडीने व्यवस्था करून रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी परिचय दिला.
पुराच्या संकटामुळे अडकलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. त्यामध्ये रोटरी क्लब अमळनेरने अत्यंत तत्परतेने पुढाकार घेत प्रवाशांना अन्नसेवा उपलब्ध करून दिली.
क्लब अध्यक्ष रोटे. महेश पाटील तसेच सेक्रेटरी व उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे स्थानक अधीक्षक श्री. अनिल शिंदे व सी. एम. आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने, तसेच पश्चिम रेल्वेचे माजी ZRUCC सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेने व विशेष प्रयत्नातून अन्नवाटपाची प्रभावी व्यवस्था उभी करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब अमळनेर आणि इतर सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे हा उपक्रम यशस्वी केला. संकटाच्या काळात सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वयंसेवकांनी प्रवाशांची मनापासून सेवा केली.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. प्रीतपालसिंग बग्गा होते. त्यांच्यासह रोटे. अभिजीत भांडारकर, रोटे. कीर्ती कुमार कोठारी, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. प्रतीक खंडेरिया, रोटे. धीरज अग्रवाल, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. ईश्वर सेनानी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. सनी कोठारी तसेच रोटरी क्लबच्या सर्व रोटेरियन सदस्यांनी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.
या सेवाकार्यासाठी अमळनेरमधील नागरिक आणि विविध संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकटाच्या प्रसंगी समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब अमळनेरने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला.



