संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आमदार अनिल पाटील यांची विधानभवनात भेट
अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री मा. अनिल भाईदास पाटील यांनी आज मुंबईतील विधानभवनात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, अमळनेर येथील परमपूज्य श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. तसेच मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून तातडीने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी केली.

आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, १ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५० वर्षांचा ऐतिहासिक व कलात्मक लाकडी गाभारा पूर्णतः जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना केवळ अमळनेरसाठी नव्हे, तर संपूर्ण खान्देशातील लाखो वारकरी व भाविकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. या भीषण दुर्घटनेत मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आणि मुख्य मंदिर सुरक्षित राहिले, ही दिलासादायक बाब असली तरी गाभाऱ्याचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभव कायमचे नष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय- खान्देशचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने दरवर्षी हजारो वारकरी येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्याचे झालेले नुकसान वारकरी संप्रदायाच्या भावना खोलवर दुखावणारे आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून, पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विशेष प्रस्ताव मंजूर करून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे जतन करत मंदिराचे पूर्ववैभव पुनर्स्थापित करावे, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद- यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत शासन या विषयावर सकारात्मक भूमिका घेईल तसेच आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. संत सखाराम महाराजांच्या पावन भूमीचे वैभव पुन्हा उभे राहावे, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नवे बळ मिळावे आणि हे ऐतिहासिक मंदिर पूर्वीच्या तेजाने पुन्हा उजळून निघावे, हीच सर्व भाविकांची सामूहिक अपेक्षा आहे.


