ब्रेकिंग
बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान; यात्रोत्सवात पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश

 

अमळनेर (दि. ०३ मे २०२६, रविवार) – श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आज सकाळी ६ वाजता बोरी नदी पात्रात भव्य प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांच्या स्वयंसेवकांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचलेला आढळून आला. शीतपेयांच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, गुटखा रॅपर्स, सौंदर्यप्रसाधनांचे प्लास्टिक आवरण, खेळण्यांचे तुकडे आदी विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. अवघ्या एका तासात तब्बल तीन घंटागाड्या भरतील इतका प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला, यावरून प्लास्टिक वापराचे भीषण चित्र स्पष्ट झाले.

यावेळी आयोजकांनी इशारा दिला की, अशाच प्रकारे प्लास्टिकचा बेफाम वापर सुरू राहिल्यास भविष्यात पर्यावरणीय संतुलन बिघडण्यासोबतच गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. नदी प्रदूषण, जमिनीची नापीकता तसेच कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

“सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या डस्टबिनमध्येच कचरा टाका,” असा संदेश देत नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. यात्रोत्सवांसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. डी. जाधव, प्रा. डॉ. पराग पाटील, डॉ. मांटे, उपप्राचार्य अमृत अग्रवाल यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

तसेच महिला योगा ग्रुप, अमळनेर महिला मंच, विविध महाविद्यालयांचे NSS स्वयंसेवक, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे सदस्य आणि अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी यांनीही मेहनत घेतली.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांनीही या अभियानाचे अभिनंदन करत पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens