ब्रेकिंग
कृषी संस्कृतीच्या आदर्श मातांच्या कृतज्ञतेचा महोत्सव म्हणजे नवरात्री महोत्सव

शेतीचा शोध लावणाऱ्या महान कर्तबगार मातांचा महोत्सव घटस्थापना..

     ‌‌ आपली प्राचीन संस्कृती आर्या भारतामध्ये येण्याच्या अगोदर फार प्रगत होती. भारतातील पहिली गण माता निऋती मानली जाते. शेतीचा शोध निऋतीने लावला.सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात आपली संस्कृती बहरली. तिचे अवशेष शोधले गेले त्यावेळी अप्रतिम नगर रचना, उत्तम शेती, प्रभावी कला असलेली मानवतावादी संस्कृती दिसून आली. निऋत्तीची कन्या दुर्गा नावाने ओळखली जाते. मातृसत्ताक पद्धती असलेले महान राज्य होते. निऋत्ती ही फार मोठा विस्तार असलेल्या प्रदेशाची राणी होती. ती कृषी कन्या होती.तिने सर्वप्रथम तांदुळाची शेती केली. भारतामध्ये अशा अनेक पराक्रमी महिला झाल्या. त्यामध्ये ‌ रेणुका, तुळजा, भवानी, दुर्गा, अंबा, सप्तशृंगी, कालिका, यल्लमा याप्रमाणे विविध नावे आहेत. 

      भारतातील प्रत्येक भागात विविध गुणसंपन्न अशा माता होऊन गेल्या. त्यात काही कृषी संस्कृतीच्या विविध धान्यांचा शोध त्यांनी लावला. काहींनी विविध औषधींचा शोध लावून लोकांची सेवा केली. काही मातांनी दीन, दुबळ्या, वंचित ,गरीब, नादार लोकांची सेवा केली. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर प्रतिकार केला. काहींनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला. या महामातांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा महोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव होय. पहिल्या दिवसाला मातीचा घट बसवून त्याच्या आजूबाजूला परडीमध्ये माती टाकून विविध धान्य टाकून पुढील हंगाम कोणता का घेता येईल याची चाचपणी घेण्याचा हा महोत्सव होय. पहिला हंगाम आलेला असतो. त्या हंगामाचा आनंद नवरात्र महोत्सवामध्ये घेतला जातो. विविध पक्वान्न बनवून देवीची पूजा केली जाते.हा महोत्सव फार प्राचीन मानला जातो. पश्चिम बंगाल मध्ये फार मोठ्या प्रमाणात देवीचा महोत्सव साजरा होतो. या महान मातांना मनोभावे अभिवादन करण्याचा हा महोत्सव होय. आपले शरीर म्हणजे घट होय. या विश्वामध्ये खूप चांगले असे निर्मिकाने भरुन ठेवलेले आहे.हया उत्तम गुणांची वाटप घट फोडून केली जाते. अशा चांगल्या गुणांची पेरणी आपल्या महान मातांनी करून ठेवलेली आहे. संत कबीराने मानवी रुपी देहाला घट म्हटलेले आहे. ते म्हणतात “सब घट बसै मेरा साइया,सुनी सेज ना कोय”. प्रत्येक घटात ईश्वर बसलेला आहे. घटातील पाणी म्हणजे आत्मा व घटाबाहेरील विशाल पाणी म्हणजे परमात्मा होय.मरणानंतर आतील पाणी बाहेरच्या पाण्याची मिळते .याचाच अर्थ आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे म्हणजे घट फुटणे होय. घटस्थापना ज्या दिवशी केली जायची त्यादिवशी मातीच्या घटामध्ये पाणी वाढलेले असायचे. या घटातील पाणी पाझरल्याने मातीमधील बी नऊ दिवसांमध्ये उमलून मोठे होत होते. याचप्रमाणे सद विचाराची पेरणी करायची असेल तर चांगला विचाराचा घट वाढलेला असला पाहिजे. नवरात्र म्हणजे नवमातांच्या वैचारिक जागरणाचे दिवस होय. आज या महान मातांचा जागत होण्याऐवजी मोठमोठे मंडळ स्थापन करून नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. आजच्या महिला हा महोत्सव प्रत्येक दिवसाला विविध रंगाच्या साड्या घालून साजरा करीत असतात. खरा महोत्सव चांगला विचाराची रुजवन करण्याचा आहे. महिलांवरील घडत असलेल्या अन्यायाविरुद्ध आजच्या महिलेने आवाज उठवण्याची गरज आहे. महिलेने दुर्गाप्रमाने स्वाभिमानाने जगले पाहिजे. प्रत्येक महिलेत कोणताही भेद न मानता एकत्रित येऊन समतेने वैचारिक जागरण केले पाहिजे. छत्रपती शिवबाची आई माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या मुलाच्या मनामध्ये स्वराज्याची ठिणगी पेटवली होती. आजच्या महिला कर्मकांड करण्यामध्ये धन्यता मानत असतात. पूजा पाठा करण्यापेक्षा आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याची उजळणी केली पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेला सत्यशोधक समाजाची कास धरली पाहिजे. सावित्रीबाईंनी महिलांसाठी जीवन समर्पित केले. अशा सावित्रीबाई च्या कार्याचे पारायण झाले पाहिजे.आज आमच्या महिला मनुवाद्यांनी रचलेल्या ग्रंथांचे पारायण करत बसतात. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, विवेक नाही, समता नाही अशा विचाराला त्या चिटकून बसलेल्या आहे. सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद होते त्याबाबत कोणत्याही महिलांनी आवाज उठवल्याचे दिसून येत नाही. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्य बलिदान केले त्या थोर ज्योती सावित्रीचा विचार तेवत ठेवण्याची गरज आहे. घरामध्ये नऊ दिवस तेलाचा दिवा लावण्यापेक्षा माझ्या परीने महिलांमध्ये वैचारिक जागृती करण्याचा वसा त्यांनी घेतला पाहिजे. आमच्या महिला पूजा पाठ करण्याच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे पोचल्याच नाहीत. आमच्या पूर्वज असलेल्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळेच आज त्यांच्या कर्तृत्वाचे आम्ही करीत आहोत. काही महिलांनी ज्योती सावित्री चे विचार आपल्या जीवनात आणून इतरांच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. खऱ्या अर्थाने त्या अभिमानास पात्र आहेत. आपणही आपल्या महान मातांचा आदर्श घेऊया..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *