ब्रेकिंग
यशवंत आश्रमशाळेला मुंबईत ‘बेस्ट स्कूल – स्टेट बोर्ड’ पुरस्कार ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’मध्ये सन्मान; संस्थेच्या मार्गदर्शनासह शिक्षकांच्या परिश्रमांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी : पिंपळे बु. येथील सु. अ. पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत ‘बेस्ट स्कूल – स्टेट बोर्ड’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सोहळ्यात शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. ESFE (Education Supply and Franchise Expo) आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील शिस्त, स्वच्छता, संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेने केलेल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात शाळेने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमातही प्रथम पुरस्कार प्राप्त केला होता.

शाळेच्या प्रगतीत माध्यमिक मुख्याध्यापक उदय आत्माराम पाटील आणि प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई युवराज पाटील, सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील आणि संचालक ॲड. अभिजीतदादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *