मंगरूळ येथे जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन १ ते ४ सप्टेंबरदरम्यान काळ्या फिती लावून निषेध; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जोरदार मागणी
मंगरूळ, ता. अमळनेर | दि. १ सप्टेंबर २०२६ :
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंगरूळ येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली. स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथे आज या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागणीसाठी दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून आपले नियमित कामकाज करीत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
जुनी पेन्शनसाठी एकजुटीचा निर्धार
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी निगडित असलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. काळ्या फिती लावून कामकाज करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीबाबतची एकजूट, नाराजी आणि ठाम भूमिका व्यक्त केली.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील, श्री. अशोक सूर्यवंशी, श्री. प्रभुदास पाटील (अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना अमळनेर), संजय पाटील, श्री. राजेंद्र पाटील, सौ. सुषमा सोनवणे, सौ. शितल चव्हाण, सौ. सिमा मोरे, सौ. श्रुती पाटील, सौ. सिमा पाटील, वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील, तसेच श्री. प्रविण पाटील, श्री. मनोज पाटील, श्री. सुदर्शन पवार, श्री. प्रदीप पाटील, श्री. खुशाल पाटील आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
काळ्या फितीच्या माध्यमातून सुरू झालेले हे आंदोलन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीसाठीच्या संघर्षाला अधिक बळ देणारे ठरत आहे.


