ब्रेकिंग
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!

 

टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने भाविक मंत्रमुग्ध; २० योगवर्गांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने विठूरायाच्या दर्शनासाठी भव्य व शिस्तबद्ध वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार सादर करणाऱ्या या वारीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या वारीचे आयोजन जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे मॅडम आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शनिवार, दि. २६ जुलै, रोजी पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकूरोड, अमळनेर येथून वारीला प्रारंभ झाला.

वारी जिजाऊ गेट, बसस्टॅण्ड, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत संत सखाराम महाराज वाडी येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.

या वारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली दिंडी, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, पालखी, विठ्ठलाची मूर्ती तसेच प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील सहभागी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात वारी पोहोचली. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने आकर्षक आणि भक्तिमय रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

वारीची सांगता रत्ना भदाणे ताई यांच्या हस्ते भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूंचे गोड प्रसाद वितरण करून करण्यात आली. या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक तसेच योग संघटन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

वारीमध्ये योगशिक्षक, साधक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही वारी विशेष लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे एकूण २० योगवर्गांनी या भव्य वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *