ब्रेकिंग
चैतन्य संदानशिव हल्लाप्रकरण तापले; आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी समाजबांधवांचा एल्गार! मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा; प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा, घोषणांनी अमळनेर दणाणले

 

अमळनेर | प्रतिनिधी

देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी गुरुवारी संताप व्यक्त करत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने महाराणा प्रताप चौक ते प्रांत कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा”, “मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी तसेच अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या चैतन्य राजेंद्र संदानशिव यांना जातीवाचक शिवीगाळ करत तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रकरणाचा निष्पक्ष, जलद व सखोल तपास करण्याची मागणी केली. भारतीय न्याय संहितेतील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच पीडित आणि साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजबांधवांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव व विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *