ब्रेकिंग
दोन दिवसांपासून सारबेटे बुद्रुक अंधारात; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

 

सारबेटे बुद्रुक : गावातील संपूर्ण वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने सारबेटे बुद्रुक गाव अंधारात आहे. वारंवार खराब होणारी डीपी बदलण्याची मागणी गावातील तरुणांनी दहा दिवसांपूर्वीच महावितरणच्या ऑनलाइन तक्रार प्रणालीवर केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

 

सारबेटे बुद्रुकचा वीजपुरवठा ढेकु बुद्रुक सबस्टेशनमधून होतो. गावातील डीपी वारंवार नादुरुस्त होत असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. सध्या संबंधित डीपी खुल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ग्रामीण वायरमन शुभम शिंपी यांच्याकडून स्थानिक पातळीवर कामकाज पाहिले जात असले, तरी आवश्यक कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे. ग्रामीण भागातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

 

दहा दिवसांपूर्वी तक्रार करूनही डीपी बदलली नाही आणि आता सलग दोन दिवस संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे तातडीने वीजपुरवठा सुरू करून नवीन डीपी बसवावी आणि खुल्या डीपीला सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर आयोगाचा ‘ॲक्शन मोड’! जळगाव मनपात विविध समस्या व अडीअडचणींवर आढावा बैठक; संघटनांच्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय

 

अमळनेर | जळगाव : जळगाव महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना तसेच त्यांच्या अडीअडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या वतीने दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबईचे उपाध्यक्ष मा. श्री. मुकशेजी सारवान तसेच त्यांचे विशेष कार्य अधिकारी मा. राजेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

 

सफाई कामगारांच्या सेवेशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित मागण्या तसेच कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध सफाई कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने आयोगासमोर सादर केली.

 

भारतीय सफाई कामगार संघटना, जळगाव यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संतोष संदानशिव यांच्यासह दिपक संदानशिव, राजेश कल्याणी, सुनील गढरे, मिलिंद संदानशिव, करण चव्हाण तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांकडे आयोगाचे लक्ष वेधले.

 

यावेळी जळगाव जिल्ह्यातील इतर सफाई कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या मागण्या व समस्या मांडत आयोगाकडे निवेदने सादर केली. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून संबंधित बाबींवर आयोगाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेण्यात आले, त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

सफाई कामगारांच्या हक्क, सेवा-सुविधा आणि विविध प्रशासकीय अडचणींच्या निवारणासाठी थेट आयोगाच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे कामगार संघटनांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा! आमदार अनिल पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र

 

अमळनेर : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व आस्थापनांतील सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय्य निर्णय देण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

 

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र शासनाच्या टप्पा अनुदान धोरणामुळे २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. दुसरीकडे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी केवळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आणि २००५ नंतर सेवेत रुजू झालेली मंडळी, परीक्षा देऊन परीक्षेचा निकाल २००५ नंतर लागलेले कर्मचारी, तसेच २००५ पूर्वी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालेले मात्र २००५ नंतर शिक्षक म्हणून मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

 

मात्र, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांनाच जुनी पेन्शन नाकारण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळणे अपेक्षित असताना शासनाच्या अनुदान धोरणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

 

शासनाकडून अनुदान उशिराने देणे हा एक अन्याय आणि त्याच कारणाच्या आधारे कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणे हा दुसरा अन्याय, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संघाने राज्यातील २८८ आमदारांना पत्र देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची तसेच हा प्रश्न विधानभवनात अधिवेशनकाळात लावून धरण्याची मागणी केली होती.

 

याच मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती. कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घेत आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

 

आमदार अनिल पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे जुनी पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित करण्यास मदत झाली असून, शासन या मागणीवर कोणता निर्णय घेते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षांच्या कन्येने पंतप्रधानांना पाठवली राखी  नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राद्वारे अरुश्री चे कौतुक 

 

अमळनेर : रक्षा बंधन म्हणजे रक्षण करण्यासाठी बांधलेला वचनाचा ,हमीचा प्रेमाचा धागा. अमळनेर येथील नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु अरुश्री हिने देशाच्या नागरिकांचे आणि बालकांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली आणि नरेंद्र मोदी यांनी देखील चिमुकलीच्या राखीला पत्राने उत्तर देत सुरक्षित ,सुखी जीवनाची हमी देत तिचे कौतुक केले आहे. 

 

     शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी,सामाजिक बांधिलकी जोपासत निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे *वैद्यकीय क्षेत्रात सेवारत असलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिथयश हृदय रोग* तज्ञ डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर व डॉ.सौ.स्वाती परीक्षित बाविस्कर यांची कन्या *रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल* मधील *इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु.अरुश्री परिक्षीत बाविस्कर* या

विद्यार्थिनीने राष्ट्रनेते, लाडके प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना जनसेवा,राष्ट्र कल्याणार्थ उदंड, निरामय आयुष्य चांगले आरोग्य मिळो या करिता पवित्र सण रक्षा बंधनाच्या पावन पर्वावर रक्षा सूत्र (राखी, शुभपत्र)पाठवले होते , कु. अरुश्री हिचे पत्र व राखी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने नुकतेच राष्ट्रनेते लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष पत्र पाठवून कौतुक करत आभार मानले तसेच

आपल्या देशाच्या मुली,विद्यार्थिनी विकसित भारताच्या योगदानात सहभाग देत असून क्रीडा, कौशल्य,शिक्षण तसेच विज्ञान,तंत्रज्ञान मध्ये चमक दाखवत असून मुली महिला राष्ट्रकल्याणात योगदान स्वयंस्फूर्त करत आपल्या शक्तीचा परिचय देत असल्याचे सांगून कौतुक केले आहे. विकसित भारत निर्माणकरिता “शक्तीच्या सप्तधारा” माध्यमातून उत्पादन , कृषी , तंत्रज्ञान ,नवे विचार , गतिशक्ती , रक्षण , ग्रीन ब्ल्यू उत्पादन सांस्कृतिक शक्तीच्या नव्या उर्जेशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. मला विश्वास आहे की आपण आपल्या प्रयत्नाने आणि योगदानाने बदलत्या भारताच्या प्रवासात योगदान देईल आपल्या उत्तम स्वास्थ्य आणि भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा असेही पत्रात म्हटले आहे.

अमळनेर पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर;  रक्तदात्याला प्रोत्साहनपर मिळणार ट्रॉली बॅग भेट

 

अमळनेर :-अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित व अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद प्रस्तुत व आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या प्रेरणेने अमळनेरात आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       “रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…”आणि “थेंब तुमचा जीवन त्यांचे – रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव” या संदेशासह हे शिबिर होणार आहे.सदर शिबीर दिनांक आज १७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार) रोजी

१) तेरापंथ भवन,न्यू प्लॉट,अमळनेर व २) प्रताप कॉलेज,व इच्छादेवी चौक अमळनेर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

      विशेष म्हणजे या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग भेट देण्यात येणार आहे.”रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती मोठा फरक!” हा यामागचा उद्देश असून सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि नवीन जीवन हा संदेश देण्यात आला आहे.

     तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,तेरापंथ युवक परिषद, अमळनेर व शिबिराचे सहयोगी असलेले रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर,न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि जैन सोशल ग्रुप,जय बजरंग व्यायाम शाळा अमळनेर आदींनी केले आहे.

नवीन मालमत्ता कर आकारणीवरून अमळनेरकरांच्या हक्काचा सवाल! ‘कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करा’; नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा — सोमचंद संदानशिव

 

अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या कर आकारणीसंदर्भात सध्या टी.पी. विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरकर नागरिकांनी केवळ सुनावणीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कर आकारणी प्रक्रियेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेऊन आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेमार्फत निविदेच्या माध्यमातून अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पद्धत, मोजणीचे निकष, कर निर्धारणाची गणना तसेच नागरिकांवर आकारण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासण्याची गरज असल्याचे सोमचंद संदानशिव यांनी स्पष्ट केले आहे.

सुनावणी सुरू; मात्र नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार का?

सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये नागरिकांना नेमकी किती सवलत मिळणार, कर आकारणीत कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आणि पूर्वी आकारण्यात आलेल्या कराचे पुनर्मूल्यांकन होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ सुनावणी घेऊन विषय संपविण्याऐवजी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची निविदा, कार्यपद्धती, मोजणीचे निकष आणि कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे तपासण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

मूलभूत सुविधा अपुऱ्या, मग कराचा वाढता बोजा कशासाठी?

विशेषतः शहरातील विविध कॉलनी परिसरांमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे. एका बाजूला आवश्यक नागरी सुविधा अपुऱ्या असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा बोजा पडत असल्यास, या कर आकारणीचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते!’

‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते,’ असा इशारा देत सोमचंद संदानशिव यांनी अमळनेरकरांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे. कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची तसेच संबंधित निविदेची सखोल चौकशी करण्यात यावी. आवश्यक असल्यास सदर कामाचा फेरविचार करून नगरपरिषदेच्या सक्षम कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करावी आणि त्यानंतर पारदर्शक, वस्तुनिष्ठ व नियमानुसार कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरिक समिती स्थापन करून लोकशाही मार्गाने आंदोलनाची गरज

या प्रश्नावर नागरिकांची समिती स्थापन करून सर्व करदात्यांना विश्वासात घेत लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. बाह्य संस्थेला देण्यात आलेल्या कामाचा खर्च अखेरीस नागरिकांच्या पैशातूनच होणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत अमळनेरकरांनी जागरूक राहून प्रशासनाला प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“हा प्रश्न कोण्या एका व्यक्तीचा नसून शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वस्तुनिष्ठ माहिती जाणून घ्यावी आणि अन्यायकारक वाटणाऱ्या कर आकारणीविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवावा,” असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

अमळनेर तालुक्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात! बुद्धिबळापासून मैदानी स्पर्धांपर्यंत विविध क्रीडा प्रकारांचा थरार; तालुक्यातील शाळा-ज्युनिअर कॉलेजांनी ऑनलाइन नोंदणी करून संघ सज्ज ठेवण्याचे आवाहन

 

 

अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ च्या शालेय शासकीय अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना लवकरच सुरुवात होत आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या विविध स्पर्धांसाठी शाळा व ज्युनिअर कॉलेजांनी तयारी सुरू केली आहे.

अशी होणार तालुकास्तरीय स्पर्धा

१) बुद्धिबळ स्पर्धा :

दि. १७ सप्टेंबर — सर्व गट मुले

दि. १८ सप्टेंबर — सर्व गट मुली

स्थळ : नोबल पोतदार स्कुल

२) बॅडमिंटन स्पर्धा :

दि. १८ सप्टेंबर — सर्व गट मुले

दि. १९ सप्टेंबर — सर्व गट मुली

स्थळ : प्रताप कॉलेज हॉल

३) कुस्ती स्पर्धा :

दि. २१ सप्टेंबर — सर्व गट

स्थळ : तालुका क्रीडा संकुल

४) फुटबॉल स्पर्धा :

दि. २३ सप्टेंबर — सर्व गट मुले

दि. २४ सप्टेंबर — सर्व गट मुली

स्थळ : प्रताप कॉलेज

५) हॉलीबॉल स्पर्धा :

दि. २६ सप्टेंबर — मुले

दि. २७ सप्टेंबर — मुली

स्थळ : जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय

६) कॅरम स्पर्धा :

दि. ३ ऑक्टोबर — सर्व गट मुले

दि. ५ ऑक्टोबर — सर्व गट मुली

स्थळ : अँड ललिता पाटील इ. स्कूल

७) कबड्डी स्पर्धा :

दि. ७ ऑक्टोबर — सर्व गट मुले

दि. ८ ऑक्टोबर — सर्व गट मुली

स्थळ : सायर देवी स्कूल

८) खो-खो स्पर्धा :

दि. १० ऑक्टोबर — सर्व गट मुले

दि. १२ ऑक्टोबर — सर्व गट मुली

स्थळ : आ.मा.पाटील आश्रम शाळा रणाईचे

९) क्रिकेट स्पर्धा :

दि. १३ ऑक्टोबर — सर्व गट मुले

दि. १४ ऑक्टोबर — सर्व गट मुली

स्थळ : प्रताप कॉलेज

१०) मैदानी स्पर्धा :

दि. १६ ऑक्टोबर — सर्व गट मुले

दि. १७ ऑक्टोबर — सर्व गट मुली

स्थळ : तालुका क्रीडा संकुल

ऑनलाइन नोंदणी करून संघ सज्ज ठेवण्याचे आवाहन

अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा तसेच ज्युनिअर कॉलेजांनी संबंधित क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन फी भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून स्पर्धेचे प्रवेश काढावेत. तसेच संघ व खेळाडू स्पर्धेसाठी तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी श्री जगदिश चौधरी सर, श्री एस पी वाघ सर व श्री संजय पाटील सर यांनी कळविले आहे.

तालुक्यातील विविध शालेय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मैदानांवर विद्यार्थ्यांचा उत्साह, कौशल्य आणि क्रीडास्पर्धेची रंगत पाहायला मिळणार असून, आगामी दिवसांत अमळनेर तालुक्यात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.

नंदगावात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांची भव्य रॅली, भजन-आरती, काव्यवाचनासह विविध धार्मिक उपक्रम; विद्यार्थ्यांना बिस्किट व फळांचे वाटप

 

नंदगाव, ता. अमळनेर | दि. १२ सप्टेंबर २०२६

नंदगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे शु. द्वितीया ता. १२/९/२०२६ रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता जी.प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करत रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी चक्रधर स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय करून टाकले. रॅलीनंतर शाळेच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर, सदभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन पाटील यांनी गंध, अक्षदा व पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व नतमस्तक होऊन स्वामींना अभिवादन केले.

यानंतर शाळेतील विद्यार्थिनी कृतिका राजेश पाटील, इयत्ता सहावी हिने भगवान चक्रधर स्वामींच्या कार्याविषयी थोडक्यात प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणातून तिने चक्रधर स्वामींच्या लीळेतील ‘मुक्या प्राण्यावर दया करावी’ हा प्रसंग स्पष्ट व समर्पक शब्दांत मांडत उपस्थितांची दाद मिळविली. तिच्या या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल गावातील सदभक्त श्रीमान मनोहर मोतीराम खैरनार यांनी तिला ५१ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.

यावेळी गावातील सदभक्त व कवी शिवाभाऊ एस. ठाकरे यांनी श्री स्वामींची आरती, भजन तसेच विविध कविता सादर करून कार्यक्रमात भक्तिमय रंग भरला. यामध्ये “छाती ठोकून सांगतो मी मानभाव आहे” ही कविता विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या काव्य सादरीकरणाला गावातील भजनी मंडळाचे सदस्य श्री खुशाल व्यंकट पाटील यांनी सुरेल स्वरसाथ दिली.

कार्यक्रमादरम्यान गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन खैरनार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. तसेच श्रीमान महेंद्र शिवाजी बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, नंदगाव-लाडगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ग्रामसेवक साहेबांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश बन्सीलाल ठाकरे व हंसराज मोतीराम खैरनार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे मोबाईलद्वारे शूटिंग करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या गावातील तरुण सदभक्त चि. सचिन सुरेश पाटील यांचेही उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

एकूणच, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमलेले नंदगाव, विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त रॅली, भक्तिमय आरती-भजन, काव्यवाचन आणि सामाजिक उपक्रमांमुळे अवतार दिवसाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.

गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची ‘थर्ड आय’! ड्रोन अन् अतिरिक्त सीसीटीव्हीचा वॉच; रात्री १२ नंतर मिरवणूक ‘जैसे थे’ ठिकाणी थांबविणार

 

अमळनेर : गणरायाला निरोप देताना उत्साहाला शिस्तीची जोड देण्यासाठी अमळनेर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेत पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. रात्री १२ वाजेपर्यंतच मिरवणूक व ध्वनिक्षेपकाची परवानगी राहणार असून, त्यानंतर मिरवणूक ज्या ठिकाणी असेल, त्याच ठिकाणी थांबविण्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी बैठकीत मांडली.

मिरवणुकीदरम्यान प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ड्रोनच्या माध्यमातूनही संपूर्ण मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून, हानिकारक गुलालाचा वापर टाळावा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी गणेश मंडळे व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

*मृत्यूच्या दाढेतून चिमुकल्याला खेचून आणले; डॉ. शरद बाविस्कर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश!* पाण्याच्या हौदात पडलेल्या दोन वर्षीय शिवला मिळाले नवजीवन; ऊसतोड कामगार कुटुंबासाठी मोफत उपचारांसह नव्या कपड्यांचीही भेट

 

अमळनेर : खेळता खेळता जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला डॉ. शरद बाविस्कर यांच्या अथक प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले. गंभीर अवस्थेत असलेल्या शिव विश्वास भिक (वय २ वर्षे, रा. ढेकू ) या बालकावर अमळनेर येथील डॉ. शरद बाविस्कर कस्तुरबा बालरुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने डॉ. बाविस्कर यांनी बालकावर मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिव हा घराजवळ खेळत असताना अचानक जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडला. काही वेळाने घरात बालक दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने घाबरून परिसरात शोध सुरू केला. शोध घेत असताना शिव हौदात पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. आईने तातडीने त्याला हौदातून बाहेर काढले.

बालकाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्याला तात्काळ वाहनाने डॉ. अनिल शिंदे व डॉ. संदीप जोशी यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी डॉक्टर शरद बाविस्कर सोबत वेळेच तात्काळ जीवनावशक ते उपचार केले तसेच डॉ शरद बाविस्कर पुढील उपचारासाठी डॉ. शरद बाविस्कर किंवा धुळे येथे जाण्यास सुचवले सदर कुटुंबाची परिस्थिती बघता ते अत्यंत खर्चाचे होते अशा वेळेस डॉ बाविस्कर यांनी बालकाला कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करून घेत शर्तीचे पर्यंत करत जीवदान दिले 

बालकाची अवस्था गंभीर असल्याने परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, “बालकाचा जीव वाचवायचा” या उद्देशाने डॉ. शरद बाविस्कर यांनी तातडीने बालकाला रुग्णालयात दाखल करून घेतले. वैद्यकीय पथकासह त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आवश्यक उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि काही काळाच्या उपचारानंतर शिवची प्रकृती सुधारू लागली. उपचारानंतर बालक पूर्णपणे बरा झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हलाखीच्या परिस्थितीतही उपचारांचा खर्च घेतला नाही

शिवच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील ऊसतोड कामगार आहेत. अशा परिस्थितीत महागडे वैद्यकीय उपचार करणे कुटुंबासाठी मोठे आर्थिक संकट ठरू शकले असते. मात्र, डॉ. शरद बाविस्कर यांनी कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेत बालकावर मोफत उपचार केले.

डॉक्टरांनी दिली मायेची भेट

शिवला नवजीवन मिळाल्यानंतर डॉ. शरद बाविस्कर यांनी केवळ उपचार करून आपली जबाबदारी संपवली नाही. बालकाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला नवीन कपडे घेऊन दिले. डॉक्टरांच्या या माणुसकीच्या कृतीने कुटुंबीय भावूक झाले.

“डॉक्टरांनी आमच्या मुलाला नवजीवन दिले. आमची परिस्थिती अत्यंत बिकट असताना त्यांनी मोफत उपचार केले आणि मुलासाठी नवीन कपडेही दिले. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,” अशी भावना शिवच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

या घटनेतून वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचे दर्शन घडले आहे. एका गरीब ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून त्याला नवजीवन देण्यात डॉ. शरद बाविस्कर व त्यांच्या वैद्यकीय पथकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.