सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
भडगाव प्रतिनिधी : येथील सौ. र. ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानांतर्गत ‘नशेमुळे होणारे तोंडाचे आजार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. मुंबई येथील एमजीएम विद्यापीठाच्या रिसर्च फेलो डॉ. हितेशा भैसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नशेच्या विविध प्रकारांमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, तोंडाच्या आरोग्याला निर्माण होणारे धोके आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांविषयी डॉ. भैसे यांनी सविस्तर माहिती दिली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भैसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय डॉ. देवेंद्र मस्की यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. चित्रा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
