दुष्काळी मदतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये द्या; एसआयआर प्रक्रिया रद्द करा! अमळनेरमध्ये महाविकास आघाडीचे जनआंदोलन; केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका
अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मदतीचा अभाव, वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेच्या निषेधार्थ अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यासह एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, संदीप घोरपडे, अॅड. तिलोत्तमा पाटील, लोटन चौधरी, अॅड. शकील काझी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, प्रा. अशोक पवार, शिवसेनेचे निंबा पाटील, प्रशांत निकम आदींनी मनोगत व्यक्त केले.
दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवरून सरकारला घेरले
महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अमळनेर तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात सापडले आहेत. मात्र, शासनाकडून अद्याप अपेक्षित दुष्काळी मदत मिळालेली नसल्याची टीका आंदोलकांनी केली. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून बेरोजगारीमुळे तरुण वर्ग त्रस्त आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारकडून सरकारी यंत्रणांचा राजकीय आणि वैयक्तिक लाभासाठी वापर होत असल्याचा आरोप करत, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरही आंदोलकांनी आक्षेप नोंदविला. तसेच राज्यातील फोडाफोडीचे आणि सूडाचे राजकारण थांबविण्याची मागणी करण्यात आली.
माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांची सरकारवर टीका
आंदोलकांनी महाराणा प्रताप चौकात ठिय्या मांडून निषेध नोंदविला. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी अमळनेरचे स्थानिक आमदार, खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या एसआयआर प्रक्रियेवर जोरदार टीका केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या.
आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. गजेंद्र साळुंखे यांनी आभार मानल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या आंदोलनात मनोज पाटील, धनगर दला पाटील, मगन पाटील, प्रा. श्याम पवार, तुषार संधान, नेहरू पवार, अशोक पवार, चंद्रशेखर भावसार, अॅड. कौस्तुभ पाटील, राजेंद्र मराठे, मनीषा परब, पी. वाय. पाटील, राजेंद्र चौधरी, प्रताप पाटील, कन्हैया कापडे, विकास पाटील, रोहिदास कापडे, हर्षल जाधव, ताराचंद सूर्यवंशी, देवेंद्र देशमुख, सईद तेली, सुनिता माने, चंदू वानखेडे, अधिकार पाटील, जुबेर पठाण, अरुण देशमुख, पितांबर पाटील, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ पाटील, दिलीप पाटील, अॅड. क्रांती ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
