ब्रेकिंग
महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान मोलाचे! प्रताप महाविद्यालयात ‘महाराष्ट्रातील वैचारिक परंपरा’ विषयावर प्रा. बालाजी चिरडे यांचे व्याख्यान

 

अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र ही विचारांची समृद्ध भूमी असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या जडणघडणीला भक्कम आधार मिळाला आहे. संत, समाजसुधारक, विविध सामाजिक चळवळी आणि वैचारिक संघर्षांनी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा समृद्ध केली आहे. या परंपरेचा अभ्यास करून विविध विचारप्रवाह तटस्थपणे समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील प्रा. बालाजी चिरडे यांनी केले.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात ‘महाराष्ट्रातील वैचारिक परंपरा’ या विषयावर त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, तत्त्वज्ञान विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते.

व्याख्यानात प्रा. चिरडे यांनी महाराष्ट्रातील वैचारिक प्रवासाचा विविध अंगांनी आढावा घेतला. एकोणिसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली, उदारमतवादी विचारांपासून राष्ट्रवादी विचारांपर्यंत विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला, याचे त्यांनी विवेचन केले. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार, प्रबोधनकार ठाकरे, राम मनोहर लोहिया आणि श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांचा संदर्भ देत विविध वैचारिक प्रवाह समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांसारख्या संघटनांच्या विचारधारांचा अभ्यास तसेच नरहर कुरुंदकर आणि शेषराव मोरे यांच्या विचारांची समकालीन प्रासंगिकता जाणून घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विचारसरणींचा अभ्यास करताना चिकित्सक दृष्टिकोन ठेवून अंतर्मुख होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्थेच्या प्राचार्या डॉ. वर्षा पाठक यांनी संत ज्ञानेश्वरांपासून नरहर कुरुंदकरांपर्यंतच्या वैचारिक प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या जडणघडणीत समाजसुधारकांचे योगदान महत्त्वाचे असून, पूज्य साने गुरुजी आणि स. ना. भालेराव यांचे योगदानही स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. शिला पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वैचारिक विकासासाठी पुस्तकवाचन आणि बौद्धिक सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. संदीप नेरकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुनील राजपूत यांनी केले आणि आभार डॉ. राखी घरटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *