ब्रेकिंग
तीन दिवसांत साडेबारा हजार नागरिकांची भेट; ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचा दिमाखात समारोप सरकारी योजनांची माहिती एकाच छताखाली; उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विभागांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी : खा. स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी उत्साहात समारोप झाला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला तीन दिवसांत साडेबारा हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली.

कृषी, हस्तकला, नाबार्ड, अणुऊर्जा, संरक्षण, भारतीय तंत्रज्ञान संस्था यांसह विविध शासकीय विभागांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना नौदल व हवाई दलातील करिअरच्या संधींसह नागरिकांना सरकारी योजनांची माहिती मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी असे प्रदर्शन आयोजित करणे आव्हानात्मक असतानाही नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले.

आमदार अनिलदादा पाटील यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुक करत, खासदार म्हणून स्मिताताई वाघ यांनी अमळनेरकरांना केंद्रस्तरीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिल्याचे गौरवोद्गार काढले. आमदार अमोल पाटील यांनीही प्रदर्शनातून शासनाच्या विविध उपक्रमांची व्यापक माहिती मिळाल्याचे नमूद केले.

समारोपप्रसंगी उत्कृष्ट सादरीकरणासाठी विविध विभागांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार यंत्र इंडिया लिमिटेड व म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांना, नवोपक्रमासाठी आयआयटी मुंबईला, वित्तीय साक्षरतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला, तर संवाद व नवोपक्रमासाठी महाजेनकोला गौरविण्यात आले. याशिवाय महावितरण, अणुऊर्जा विभाग, भारतीय मानक ब्युरो, डिजिटल इंडिया-भाषिणी, महापारेषण, आयुष मंत्रालय, सीएसआयआर, भारतीय स्टेट बँक, भारतीय चहा मंडळ आणि आयआरसीटीसी यांचाही विविध श्रेणींमध्ये सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार अमोल पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक, संजय पाटील यांनी सूत्रसंचालन, तर अखिला श्रीवासन यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *