ब्रेकिंग
शेतकी संघाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पन्नाचे प्रकल्प उभारणार गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पेट्रोलपंपासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आमदार अनिल पाटील यांचे आश्वासन

 

अमळनेर : तालुका शेतकी संघाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी संघाच्या मालकीच्या मोकळ्या जागेचा योग्य वापर करून गोडाऊन, कोल्ड स्टोरेज अथवा पेट्रोलपंपासारखे उत्पन्नाचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले.

अमळनेर तालुका शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जुना टाऊन हॉल येथे २१ रोजी सकाळी १० वाजता संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण नसल्याने सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून व्यवस्थापक संजय पाटील यांनी संघाचा अहवाल वाचून दाखविला.

सभेदरम्यान काही सभासदांनी अजेंडा मिळाला नसल्याची तक्रार केली. तसेच शेतकी संघाच्या भंगार विक्रीच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. काही सभासदांनी भंगार विक्रीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. अखेर भंगाराची विक्री पारदर्शक पद्धतीने आणि जाहीर लिलावाद्वारेच करण्यात यावी, या अटीवर ठराव मंजूर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष गणेश भामरे, संजय पुनाजी पाटील, सचिन पाटील, प्रफुल पवार, विक्रांत पाटील, सुषमा देसले, सुरेश पिरन पाटील, नितीन पाटील, जितेंद्र पाटील, मालुबाई पवार, शंकर बैसाणे, रणजित पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेत ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, सुरेश पाटील, जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे आणि बन्सीलाल भागवत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान, सभा संपल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी सभासदांनी शेतकी संघाला शासकीय खरेदी केंद्र मिळवून देण्याची मागणी केली. त्यावर मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी शेतकी संघाच्या पडून असलेल्या मोकळ्या जागेचा व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करून संस्थेसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

गोडाऊन, कोल्ड स्टोरेज किंवा पेट्रोलपंप यांसारखे प्रकल्प उभारल्यास संघाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *