ब्रेकिंग
पर्यावरण संवर्धन व शेतकरी बांधवांसाठी संवेदनशील नागरिकांचे श्रमदान; लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेवर सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी साधला निशाणा.

अमळनेर | प्रतिनिधी

“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा मानवतेचा संदेश देणारे थोर समाजसेवक, साहित्यिक आणि राष्ट्रसेवक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमळनेरमध्ये त्यांच्या विचारांचा जिवंत वारसा अनुभवायला मिळाला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. ११) स्मारक परिसरातील रस्त्याची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि श्रमप्रतिष्ठेचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून साने गुरुजींना कृतीतून अभिवादन केले.

उपक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, खान्देशातील श्रमसंस्कार छावण्यांतून घडलेली तरुणाई, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मारक परिसरातील रस्ता अनेक ठिकाणी खराब झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे आणि रस्ता समतल करण्याची कामे श्रमदानातून पूर्ण केली. लोकसहभागाच्या बळावर सार्वजनिक प्रश्न सोडविण्याचा आदर्श यावेळी पाहायला मिळाला.

या उपक्रमासाठी स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील, अमेय मुंदडा, डॉ. विकास हरताळकर, नगरसेवक अनिल महाजन, चेतन सोनार तसेच माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले.

सकाळी ६ वाजेपासून सुरू झालेल्या श्रमदानात डॉ. मिलिंद वैद्य, गोपाळ नेवे, चेतन भोई, शुभम पवार, प्रथमेश कोठावदे, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, शिव निकम, सुनील वाघमोडे, डॉ. अतुल चौधरी, तुषार पाटील, किशोर महाजन, हेमंत बडगुजर, प्रणव पाटील, विक्रांत पाटील, दर्शना पवार, लोकेश वाणी, हेमंत भामरे, भागवत गुरुजी, डॉ. दिनेश पाटील, उमेश चौधरी, सुनील पाटील, संदीप चौधरी, सतीश देशमुख, रोहित चौधरी, डॉ. संदीप सराफ, गौरी सराफ, मनीष सराफ, आर. पी. पवार यांच्यासह असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या उपक्रमातून साने गुरुजींनी दिलेला श्रमप्रतिष्ठा, लोकसहभाग, समाजसेवा आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपला गेला. स्मृतिदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी केवळ अभिवादन न करता समाजहितासाठी श्रमदानाचा मार्ग स्वीकारत साने गुरुजींच्या विचारांना खऱ्या अर्थाने उजाळा दिला.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त करताना, भविष्यातही लोकहित आणि समाजविकासासाठी अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

पर्यावरण संवर्धन, शेतकरी हित आणि सामाजिक बांधिलकी जपत संवेदनशील नागरिकांनी श्रमदानातून आपले कर्तव्य पार पाडत समाजापुढे आदर्श निर्माण केला. यावेळी नागरिकांनी केवळ श्रमदानच नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेबाबतही परखड भूमिका मांडली.

“खरंतर सध्या आपण निवडून दिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींची कर्तव्यभावना हरवत चालली आहे. जनतेचे प्रश्न सोडविताना अहंकार आणि दंभ वाढताना दिसतो. जणू काही ते जनतेवर उपकारच करत आहेत, अशी भावना निर्माण होत आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.

नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, कोणताही आमदार, खासदार किंवा मंत्री स्वतःच्या खिशातून खर्च करून जनतेची कामे करत नाही. लोकांची कामे करण्यासाठी त्यांना मानधन, विविध सुविधा आणि निवृत्तीनंतर पेन्शनची तरतूद असते. त्यामुळे जनसेवा ही त्यांची जबाबदारी असून त्याकडे उपकाराच्या दृष्टीने पाहिले जाऊ नये.

यावेळी लोकशाहीतील मतदारांच्या भूमिकेवरही भर देण्यात आला. “जोपर्यंत मतदार पैसे, प्रलोभने आणि व्यक्तिपूजेला बळी पडत राहतील, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. नागरिकांनी विधायक मुद्दे, मुलभूत सुविधा आणि विकासाच्या आधारावर मतदान करणे आवश्यक आहे. तरुणाई, शेतकरी आणि महिला यांनी पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन करण्यात आले.

समाजातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धन, शेतकरी प्रश्न आणि मुलभूत गरजांशी संबंधित विषयांवर लवकरच व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेवटी, “पाठीचा कणा ताठ असलेल्या आणि तो ताठ करण्याची इच्छा असलेल्या सर्व भाऊ-बहिणींना सोबत घेऊन समाजहिताच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच राहील. जनतेचा विश्वास, स्नेह आणि प्रेम हीच माझी खरी संपत्ती असून त्याच बळावर मी ठामपणे उभी आहे,” असा भावनिक संदेश देण्यात आला.

 द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींची ७६ वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरीखरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’चा संदेश विद्यार्थिनींनी केला आत्मसात

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, समाजसेवक आणि मानवतावादी विचारवंत परमपूज्य सानेगुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या अमर गीतातून मानवतेचा संदेश देणाऱ्या सानेगुरुजींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी त्यांच्या जीवनकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत समाजाला प्रेम, बंधुभाव आणि समतेचा संदेश देणाऱ्या या महान विभूतीस विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, श्री. राजेश बिर्‍हाडे तसेच श्री. प्रविण पुरकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी सानेगुरुजींच्या राष्ट्रसेवा, सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर करून सानेगुरुजींच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

सानेगुरुजींच्या प्रेरणादायी जीवनातून विद्यार्थिनींनी प्रेम, त्याग, सेवा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार आत्मसात करावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

दोधवद गावठाण परिसरातील पडीत जंगलाला भीषण आग; अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

 

अमळनेर प्रतिनिधी :

अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दोधवद हद्दीतील गावठाण परिसरालगतच्या पडीत जंगलामध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. कोरडे गवत, पडीत जंगल आणि वेगवान वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत मोठ्या क्षेत्राला आपल्या विळख्यात घेतले. या दुर्घटनेत अनेक शेतकऱ्यांचे शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता आणि वाऱ्याचा वाढता वेग यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच समर्थ किचन ट्रॉलीचे संचालक जितेंद्र पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी (सीओ) यांच्याशी थेट संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. त्यांच्या विनंतीची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या.

घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलातील फायरमन दिनेश बिराडे, फारुक शेख, वाहन चालक सत्यम भाऊ, रफिक खान आणि आकाश संतांशू यांनी अत्यंत धाडसाने आणि जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. धूर, प्रचंड उष्णता आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आग रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या भीषण आगीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील **शेतीपंपांच्या वायरी, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन साहित्य, कुंपण तसेच इतर शेती उपयोगी साहित्य** जळून खाक झाले. वर्षानुवर्षे कष्ट करून उभे केलेले साहित्य काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी आपल्या डोळ्यांसमोर मेहनतीची कमाई राख होताना पाहून हळहळ व्यक्त करत होते.

या आगीने केवळ पडीत जंगल जाळले नाही, तर अनेक शेतकरी कुटुंबांच्या आशा, मेहनत आणि उद्याच्या स्वप्नांनाही मोठा फटका दिला आहे. सुदैवाने ग्रामस्थांची एकजूट, अग्निशमन दलाचे धाडस आणि प्रशासनाची तत्परता यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेच्या जखमा दोधवद परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मनावर दीर्घकाळ कायम राहणार आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – राकेश जगताप युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

 

अमळनेर : समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे व कट्टर पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँक, अमळनेरचे व्यवस्थापक राकेश जगताप यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी प्रा. डॉ. राहुल निकम आणि प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना “निबंध कसा लिहावा?” याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अर्बन बँकेचे संचालक तथा माजी व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य जाहीर केले. अशोक बिऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिशा संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील आणि डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या मोठ्या गटात पुणे, मुंबई, अमरावती, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर निबंध प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर लहान गटात अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोठ्या गटातील विजेते

प्रथम क्रमांकाचे १,००० रुपयांचे बक्षीस (आबासाहेब व.ता. पाटील यांच्या स्मरणार्थ, प्रायोजक – नगरसेविका प्रा. योगिताताई कापडणेकर) शुद्धोधन मिलिंद बागुल (धुळे)यांना प्रदान करण्यात आले.

द्वितीय क्रमांकाचे ७५० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – योगराज (बाळासाहेब) संदानशिव) रुद्राणी विनोद राव राऊत (अमरावती) यांना मिळाले.

तृतीय क्रमांकाचे ५०० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – चिंधु वानखेडे) पल्लवी जगतराव शिंदे (हातेड) यांना प्रदान करण्यात आले.

उत्तेजनार्थ पुरस्कार संगीता विलास बाविस्कर (शिक्षिका, एन. टी. मुंदडा हायस्कूल, अमळनेर) व तरन्नुम मन्सूर शेख (शिक्षिका, जी. एस. हायस्कूल, अमळनेर) यांना देण्यात आले.

लहान गटातील विजेते

प्रथम क्रमांक – रोहिणी समाधान भोई (इयत्ता ११ वी विज्ञान, आश्रम शाळा, गडखांब)

द्वितीय क्रमांक – डिंपल कपिल पाटील (गडखांब)

तृतीय क्रमांक – आरोही राकेश गोसावी (इयत्ता ६ वी, भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा, अमळनेर)

उत्तेजनार्थ पुरस्कार – पियुष राजेंद्र मोरे (गडखांब) व मिताली विवेक गोसावी (स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर)

सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तके व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ही सर्व बक्षिसे युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात आली.

या समारंभाला चेतन जाधव, बापूराव ठाकरे, अजय भामरे, प्रा. उषा देवरे, हृदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, हरिश्चंद्र कढरे, राकेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; २०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

 

अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश तसेच शाखा उद्घाटन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.

कार्यक्रमास आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे, तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले.

यावेळी चंद्रकांत मोरे, प्रा. शामकुमार जाधव (तालुका कार्याध्यक्ष), विशाल ब्रह्मे, महेश ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, लखन महाले, अमृत मेराळे, युवा अध्यक्ष विनोद बिऱ्हाडे, दिव्यांग आघाडी प्रमुख भट्टू बिऱ्हाडे, एकलव्य सेनेचे दयाराम ठाकरे, सरपंच भरवस, राहुल महाले, रमा आबा केदार, दीपक बिऱ्हाडे (ग्राम सदस्य, गडखांब), गौतम शिरसाठ, किरण बच्छाव, अंकुश बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी जुबेरभाई खान मेहमूद खान मेवाती, शाखाध्यक्षपदी मुबश्शीर खान गुलाम रसूल खान मेवाती, उपाध्यक्षपदी अफरोज खान जमील खान मेवाती, कार्याध्यक्षपदी शाबिर खान इस्माईल खान मेवाती, सचिवपदी जुबेर खान उमर खान मेवाती, सरचिटणीसपदी मुस्तकीम शाह, चिटणीसपदी गुलाम रसूल हशीर खान मेवाती, खजिनदारपदी वकील खान रौफ खान मेवाती, सहसचिवपदी फारुख खान नशीब खान मेवाती यांची निवड करण्यात आली. तसेच जुनेद खान याकूब खान मेवाती व फारुख खान गनी खान मेवाती यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, “जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. पक्ष मजबूत करताना गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने करावे.” त्यांनी युवकांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या मनोगतात युवकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. संघटनात्मक बळ वाढवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपण सर्व एक आहोत. समाजातील कोणतीही समस्या ही सर्वांची समस्या आहे. एकजुटीच्या बळावर आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी सर्वांनी संघटित राहून कार्य करणे काळाची गरज आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये प्रवेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर – धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ आज सकाळी अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडला. कार, मोटर सायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत माहिती अशी की आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाच्या पुढे असलेल्या हॉटेल वृंदावन जवळ हा अपघात झाला. अमळनेर कडून धुळ्याच्या दिशेने मोटर सायकल आणि एसटी बस जात होत्या. याच वेळी धुळ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला कारने जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाला असून चालक धरणगाव येथील रहिवासी आहे त्याच्या जागीच मृत्यू झाला. तर कार मधील पाच प्रवासांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व गुजरात मधील व्यारा येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. ते सर्वजण अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असल्याची माहिती मिळाली. मात्र या अपघातात कारमधील एका लहान मुलाला जीवदान मिळाले असून स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या लहान मुलाला कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर बसमधील एक प्रवासी जखमी असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले
दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड शोक कळा पसरली आहे. काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक   राज्यस्तरीय बैठकीत रचनात्मक लढ्याची घोषणा

 

नाशिक:- अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात महाराष्ट्रातील विविध सामाजिक, राजकीय आणि संविधान वादी संघटनांनी एकत्र राज्यव्यापी जन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दिनांक 5 जून रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आरक्षण उप वर्गीकरण हा सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या मूलभूत तत्वांना हरताळ फासणारा निर्णय असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

                या बैठकीत राज्यभर जनसंवाद, बैठका, निवेदन, अभ्यास वर्ग, संविधान जनजागृती कार्यक्रम आणि समाज संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. अनुसूचित जाती समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती समाज किंवा संघटने विरोधात नसून शासनाच्या धोरणात विरोधात लोकशाही आणि संविधानिक लढा असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सामाजिक सलोखा, बंधुता आणि एकात्मता अबाधित राखण्याचे आवाहनही उपस्थित त्यांनी केले. सोशल मीडियावर समाजात फूट पाडणारी, वैमानस्य निर्माण करणारी अथवा समाजाची एकजूट कमकुवत करणारी कोणतीही पोस्ट, भाष्य किंवा विधान करू नये असे आवाहन बैठकीत करण्यात आले. 

              या बैठकीस विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व विद्यार्थी यांसह एड. सुरेश माने, कृष्णा शिंदे, कॅप्टन कुणाल गायकवाड, प्रबुद्ध साठे, माजी आमदार बाबुराव माने, मौलाना सलीम खान, एड. प्रवीण साळवे, डी. टी. गोतीस, काळुराम चौधरी, डॉ. प्रमिला पवार, एड. चंद्रकांत निकम, प्रा. गंगाधर अहिरे, अरुण भालेराव, डॉ. विशाल जाधव, एड. कृष्णा शिलावत, शरद गोरे, निलेश गांगुर्डे, लालचंद शिरसाट, विजय बागुल यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता

 


अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सर्वत्र जोरदार स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या स्वच्छता उपक्रमाद्वारे शहरातील धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता केली आहे. दररोज पहाटे उठून ‘ आप ‘ चे कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील एका ठिकाणी जाऊन तेथील परिसर स्वच्छ करत आहेत.
दरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या नसल्याने नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे. घंटा गाड्या केवळ नावाला असून काही भागात घंटागाळा येत नसल्याची आणि आल्या तरी थांबत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटा गाड्या नियमित आणि वेळेवर द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याचेही नियोजन करावे.


शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत हे यावेळी व्यक्त करण्यात आले. निवेदनावर आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, उपाध्यक्ष रामकृष्ण देवरे, राजेंद्र जाधव, मुकेश राजपूत, मोहन मनोरे, सुधाकर गजरे, प्रतिभा गजरे, लियाकत अली, शेजात खाटीक, प्रवीण सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अमळनेरच्या राजेंद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र पाटील यांना “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षणासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली’ आणि ‘प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अल्पबचत भवनात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


या सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तसेच पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अध्यापनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सहकार, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या याच बहुआयामी कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यास शिक्षक आमदार सत्यजित तांबे, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र सल्लागार प्रदीप सोनवणे, विराज कावडीया, रणजित सोनवणे, एच. जी. इंगळे, गोविंद पाटील आणि जितेंद्र बोरसे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांना मिळालेल्या या सन्मानामुळे अमळनेर तालुका, शिक्षक वर्ग, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रपरिवार, हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार अमळनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद असून शिक्षण क्षेत्रातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात शुक्रवारी नाशिक मध्ये राज्यव्यापी बैठकीचे आयोजन   राज्यभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते राहणार उपस्थित 

 

अमळनेर जि. जळगाव:- अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या प्रक्रिये विरोधात राज्यभरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. आरक्षणाचा मूळ घटनात्मक ढाचा, सामाजिक एकात्मता आणि अनुसूचित जातींचे संविधानिक हक्क अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी दिनांक 5 जून रोजी दुपारी बारा वाजता नाशिक येथे राज्यस्तरीय जनआंदोलनाची हाक देण्यासाठी निर्णय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक डॉ. आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटी, विजय ममता जवळ, नाशिक पुणे रोड नाशिक येथे होणार आहे.

                  या बैठकीत आरक्षण उपवरगीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करणे, हरकतीन साठी मुदत वाढ देणे, जातनिहाय जनगणना राबविणे यांसह विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे. राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संविधान प्रेमी नागरिक व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून पुढील राज्यव्यापी आंदोलनाचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.

             या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कृष्णा शिंदे, ऍड. सुरेश माने, कॅप्टन कुणाल गायकवाड, प्रबुद्ध साठे, माजी आमदार बाबुराव माने, मौलाना सलीम खान, प्रवीण साळवे, डीटी गोतीस, काळूराम चौधरी, सत्यजित साळवे, डॉ. आशिष तांबे, डॉ. प्रमिला पवार, संतोष शिंदे, ऍड. चंद्रकांत निकम, प्रा. गंगाधर अहिरे, अरुण भालेराव, डॉ. विशाल जाधव, ऍड. कृष्णा शिलावत, चंद्रकांत ठाकरे, गणेश खंडारे, शरद गोरे, अजमल खान, सुनील कदम, निलेश गांगुर्डे, लालचंद शिरसाट, विजय बागुल आदींनी केले आहे.