एचआयव्ही सह जगणाऱ्या महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी उल्लेखनीय कार्य; आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालय चा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार’
अमळनेर : एचआयव्ही सहजगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण, घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांसाठी सक्षम यंत्रणा तसेच वंचित घटकांसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांना स्नेहालय संस्था अहिल्यानगर* तर्फे प्रदान करण्यात येणारा *‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’* प्रदान करण्यात आला.
तीन दशकांपूर्वी एचआयव्ही आणि एड्स या शब्दांची समाजात प्रचंड दहशत होती. कोणताही दोष नसताना एचआयव्हीची लागण झालेल्या महिला व बालकांना समाजाकडून अमानुष वागणूक मिळत होती. उपचार, सहानुभूती आणि सामाजिक संधींपासून त्यांना वंचित ठेवले जात होते. अशा काळात स्नेहालय संस्थेने १९९२ मध्ये उपचार व निवासी पुनर्वसनाची पायवाट भारतात प्रथम निर्माण केली. १९९९ पासून जळगाव जिल्ह्यात डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद व प्रा डॉ.विजय वाघमारे यांनी आधार बहुउद्देशीय संस्थे च्या माध्यमातून ही वाट पुढे नेण्याचे काम सुरू केले.
लैंगिक कामगार महिलांना एचआयव्हीबाबत जाणीव करून देणे, एचआयव्ही बाधित महिला व त्यांच्या मुलांना उपचार व पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देण्याचे कार्य आधार संस्थेने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केले आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील 16,000 एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबात सोबत आधार कार्यरत आहे
संस्थेने लैंगिक शोषित व वंचित महिलांना आधार कार्ड, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, मिशन वात्सल्य ,बाल संगोपन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य सुविधा, विमा योजना आदी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासोबतच महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, बालविवाह आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही संस्थेने प्रभावीपणे काम केले आहे. बचत गटांसह विविध माध्यमांचा सुयोग्य वापर करून महिलांना संघटित, जागरूक व सक्षम करण्याचे कार्य संस्थेने केले.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हे कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरत आहे. वंचित महिला व बालकांना केवळ मदत न करता त्यांना आरोग्य, शिक्षण, सामाजिक सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या कार्याची स्नेहालय संस्थेने विशेष दखल घेतली.
*बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल* येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक *विवेक सावंत* प्रमुख संवादक म्हणून उपस्थित होते. नागेबाबा परिवाराचे कडुभाऊ काळे आणि स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष मा. *गिरीश कुलकर्णी* यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भारती पाटील, पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ₹५० हजार, सन्मानपत्र आणि पुस्तकांचा संच असे होते.
स्नेहालय संस्थेने आधार संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, “जळगाव जिल्ह्यातील आपले कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी बनले आहे. पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्काराने आपल्याला गौरविताना धन्यता वाटते,” अशा शब्दांत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद व सचिव प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी संस्थेला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सामाजिक कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा पुरस्कार संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल असून, भविष्यात वंचित महिला, एचआयव्ही बाधित व्यक्ती आणि बालकांच्या हक्क व पुनर्वसनासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्नेहालय संस्थेतर्फे विविध तळागाळातील सेवा कार्यांशी देणगीदार, कार्यकर्ते आणि तरुणाईला जोडण्यासाठी सन १९९५ पासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. ‘बा’, ‘बापू’ आणि ‘विनोबा’ पुरस्कार सामाजिक क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जातात.
आधार बहुउद्देशीय संस्थेला मिळालेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार’ हा संस्थेच्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा सन्मान असून, अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
आधार बहुउद्देशीय संस्था
