ब्रेकिंग
जातिवाचक शिवीगाळ, धमकी व खोट्या गुन्ह्यात गोवल्याच्या आरोपावरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा

 

अमळनेर | प्रतिनिधी :

      अमळनेर येथील ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांच्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचे संपादक राजकुमार भवरलाल छाजेड यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               अजय भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ ते १.१५ वाजे दरम्यान माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीसंदर्भात राजकुमार छाजेड यांनी कथितरीत्या जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे.

तसेच दि. १७ सप्टेंबर रोजी राजकुमार छाजेड यांना कुणीतरी धमकी दिल्याच्या प्रकरणात आपले नाव टाकून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही भामरे यांनी तक्रारीत केला आहे. 

              याबाबत माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे प्राप्त करून सत्यता पडताळली असता, आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

           या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2) व 352, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(p), 3(1)(q), 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

               दरम्यान, खोट्या गुन्ह्यात गोवल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही भामरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते करीत आहेत. तक्रारीतील आरोप, उपलब्ध कागदपत्रे, पुरावे तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *