साहित्य, कला, अर्थकारण अन् राष्ट्रवादाचा संगम; अमळनेरात उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला अर्थतज्ज्ञ डॉ. आशुतोष रारावीकर, गीतकार बाबासाहेब सौदागर, नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्यासह नामवंत वक्त्यांची मांदियाळी; ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान वैचारिक मेजवानी
अमळनेर प्रतिनिधी : मराठी साहित्य, कला, अर्थकारण, राष्ट्रवाद आणि गझल अशा विविध विषयांचा समृद्ध वैचारिक आविष्कार घडविणारी शारदीय व्याख्यानमाला अमळनेर येथे ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते विचार मांडणार असून, साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानांना सुरुवात होईल. अर्थतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. आशुतोष रारावीकर, चित्रपट गीतकार व चरित्र अभिनेते बाबासाहेब सौदागर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे, अभिनेता-दिग्दर्शक अतुल पेठे आणि गझलकार-पत्रकार प्रदीप निफाडकर हे वक्ते या व्याख्यानमालेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
पाच दिवस, पाच वैचारिक विषय
रविवार, ११ ऑक्टोबर : ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’
व्याख्यानमालेचा प्रारंभ मुंबई येथील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यिक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयातून जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सोमवार, १२ ऑक्टोबर : ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’
श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार, चरित्र अभिनेते, निसर्गकवी तसेच पटकथा-संवाद लेखक बाबासाहेब सौदागर हे ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील आणि डॉ. संजय देसले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार, १३ ऑक्टोबर : ‘लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद’
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे हे लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक विचारांचा आणि राष्ट्रवादाचा वेध घेतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ दीपक शिंदे आणि जयवंतराव मन्साराम पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
बुधवार, १४ ऑक्टोबर : ‘जीवनात कला, कलेत जीवन’
पुणे येथील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माता अतुल पेठे हे कला आणि जीवन यांच्यातील परस्परसंबंध उलगडणार आहेत. या कार्यक्रमाला नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी तसेच डॉ. मनीषा भावे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
गुरुवार, १५ ऑक्टोबर : ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’
व्याख्यानमालेचा समारोप पुणे येथील गझलकार व पत्रकार प्रदीप निफाडकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’ या विषयातून गझल या काव्यप्रकाराचा भाषिक व साहित्यिक प्रवास उलगडला जाणार आहे. या दिवशी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील, विक्रांत भास्करराव पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी आणि प्रमोद खेमचंद राणेराजपूत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
साहित्यरसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांतून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव मिळवून देणाऱ्या या व्याख्यानमालेचा अमळनेरातील नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
