ब्रेकिंग
अमळनेर क्रीडा संकुलातील सुविधांचा वनवास संपवा! लाईट, पाणी, ट्रॅक, ओपन जिमसह फुटबॉल पोल व कंपाऊंडचे काम तातडीने पूर्ण करण्याची ललित सातपुतेंची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असून, त्याचा थेट परिणाम सराव करणाऱ्या खेळाडूंवर होत असल्याचे निदर्शनास आणून देत ललित सातपुते यांनी क्रीडा विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तालुका क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊन प्रलंबित सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली असून, मागण्या मार्गी न लागल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अमळनेर क्रीडा संकुलाचा उपयोग विविध क्रीडा प्रकारांचा सराव करणारे खेळाडू, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, संकुलात पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव, पाण्याची सुविधा, धावपट्टी (ट्रॅक), ओपन जिम, फुटबॉल पोल तसेच संरक्षक कंपाऊंडचे काम यांसारख्या मूलभूत बाबी अद्याप पूर्णत्वास न गेल्याने खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा संकुलाचा प्रभावी वापर होणे आणि स्थानिक पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सातपुते यांनी म्हटले आहे. संबंधित विभागाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या मागण्यांसंदर्भातील निवेदनाच्या प्रती क्रीडामंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अमळनेर नगरपरिषद प्रशासन यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि क्रीडा संकुलातील प्रलंबित कामांना कधी गती मिळते, याकडे खेळाडू व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

“खेळाडूंना सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, क्रीडा संकुलात आवश्यक त्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा ललित सातपुते यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *