आविष्कार–२०२६ स्पर्धेत अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
अमळनेर :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘आविष्कार–२०२६’ संशोधन व नवोपक्रम स्पर्धेत अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या वतीने शितल संतोष सोनवणे, प्रज्ञा अशोकराव शिरुडकर, तेजस्विनी दिलीप पाटील, अनुजा रोहिदास पाटील आणि जान्हवी संजय पाटील या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संकल्पनेवर आधारित संशोधनात्मक मॉडेल व सादरीकरण तयार केले. सामाजिक समस्यांचे आकलन, गरजांचे मूल्यांकन, समुदायाचा सहभाग, विविध शासकीय योजना व संस्थांशी समन्वय, समाजकार्य हस्तक्षेप आणि शाश्वत सामाजिक परिवर्तन या विविध बाबींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला.
या प्रकल्पाच्या निर्मितीपासून सादरीकरणापर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख प्रा.डॉ जगदीश सोनवणे, प्रा.डॉ विजयकुमार वाघमारे आणि प्रा. डॉ अस्मिता सर्वय्या यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी संशोधनाची मांडणी, मॉडेल निर्मिती, सादरीकरण कौशल्य आणि समाजकार्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रभावीपणे मांडणी करण्याची संधी मिळाली.
आविष्कार–२०२६ सारख्या संशोधनाधिष्ठित व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि समाजातील विविध प्रश्नांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होत असल्याचे मत मार्गदर्शक प्राध्यापकांनी व्यक्त केले.
या सहभागाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन अभिजीत भांडारकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे समाजकार्य शिक्षणासोबत संशोधन व नवोपक्रमाची सांगड घालण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला आहे.
