ब्रेकिंग
डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या! शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांचे आवाहन; रस्ते, वीज व सार्वजनिक समस्यांवरही उपस्थितांच्या सूचना

 

अमळनेर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी अमळनेर शहरातील वाणी मंगल कार्यालयात दिनांक १ रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी गणेशोत्सव भक्तिभावाने, उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे आवाहन करताना ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन केले.

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा सांस्कृतिक वारसा जपतानाच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले.

बैठकीला उपअधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

रस्त्यांची दुर्दशा, वीज समस्येवरही आवाज

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षितता याबाबत उपस्थितांनी प्रशासनासमोर विविध सूचना मांडल्या. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच संभाव्य समस्या वेळीच दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

बैठकीत चेतन राजपूत, प्रवीण पाटील, दिनेश शेलकर, विक्रांत पाटील, शकील काजी, रणजीत शिंदे, नितीन भदाणे यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडत शहरातील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

‘उत्सव आपला, जबाबदारीही आपली’

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपरिषद, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ध्वनिप्रदूषण टाळणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत प्रशासनाचा ‘शांतता, सुरक्षितता आणि संस्कृतीचा सन्मान’ हा स्पष्ट संदेश अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *