ब्रेकिंग
डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक

 

भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय या विषयावर प्रभावी मांडणी; गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन

अमळनेर : समग्र शिक्षण जिल्हा परिषद जळगाव व गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी शाळेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेची कुमारी मयुरी संदीप महाजन हिने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर प्रभावी मांडणी करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब यांच्या हस्ते मयुरी महाजन हिला बक्षीस देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांना नवी ओळख मिळाली आहे.

मयुरी महाजन हिने विषयाचा सखोल अभ्यास करून भारतीय ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच त्यावरील संभाव्य उपाय यांची प्रभावी मांडणी केली. तिच्या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांनी दाद देत तिला प्रथम क्रमांक बहाल केला.

या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.

मयुरीच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान विषयात अभ्यास, प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

मयुरी महाजन हिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मयुरी महाजन हिच्या या यशासाठी शाळेतील सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक तसेच कर्मचारी बंधू-भगिनींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

अमळनेर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाहनधारकांची कसरत; बालके, विद्यार्थी व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न — नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

 

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.

यासोबतच शहरात भटक्या कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान बालके, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शाळा, बाजारपेठ, रुग्णालये तसेच रहिवासी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त, भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रभावी मोहीम, तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, अमळनेर नगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

 

अमळनेर : येथील सरस्वती शिशुवाटीका या पूर्व प्राथमिक शाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. 

      कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रधानाचार्य सौ.किरण भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गान,राष्ट्रगीत व राज्य गीताचे विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक गायन केले व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. 

            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सुभेदार किशोर ठाकरे व रा.स्व.संघाचे तालुका सहकार्यवाह अॅड.विशाल महाजन यांची उपस्थिती होती. सुभेदार किशोर ठाकरे यांनी आपल्या सेवा काळात विविध मोहिमेत घेतलेला सहभाग व त्यात आलेले अनुभव कथन केले. मागील वर्षी झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” मध्ये घेतलेल्या सहभागाचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. सैनिकी सेवेत तरूणांनी सहभागी व्हावे यासाठी लहानपणापासून तयारी करणे आवश्यक आहे असे सुभेदार किशोर ठाकरे यांनी सांगितले.अॅड.विशाल महाजन यांनी शालेय जीवनातील संस्कार व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात उपयुक्त ठरतात.विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचा पाया मजबूत होण्यास शिक्षणाबरोबर संस्कार देणा-या अशा शाळांमुळे मदत होते असे उद्गार काढले. 

*सांस्कृतिक कार्यक्रम*

        वेशभूषा सादरीकरणात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा करून त्यांच्या विचारांचे प्रकटीकरण केले. यात भारत माता, सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,

पंडित जवाहरलाल नेहरू,

सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई,सैनिक,पोलीस आदी भुमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. चिमुकल्या वक्त्यांची देशभक्तीपर भाषणे,सामूहिक व वैयक्तिक नृत्य अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

         या कार्यक्रमाला पालक बंधू भगिनी, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रविंद्र पाटील,

दिनेश नाईक,मनोहर सोनवणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक वर्ग,परिसरातील नागरीक उपस्थित होते. 

      कार्यक्रमात सौ.आम्रपाली संदानशिव यांनी स्वागत गीत सादर केले.सौ.माहेश्वरी राजपूत व सौ.काजल राठोड यांनी सुत्रसंचालन केले तर सौ.किरण भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रति,

मा.संपादक/प्रतिनिधी

      कृपया वरील वृत्त प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती.

हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

 

अमळनेर : अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांच्या मालकीच्या हॉटेल पायलच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश बिराडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण व भिका संतांची यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.

सकाळच्या वेळेत गोडाऊनला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने वेळ न दवडता केलेल्या जलद कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील समजू शकला नसून, संबंधित विभागाकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

भारतीय सैनिकांच्या मनोधैर्यासाठी अमळनेरमध्ये ‘आप’चा अनोखा उपक्रम; १००० हून अधिक विद्यार्थ्यांचे ‘भाऊ-बहीण’ म्हणून दिलेले प्रेम १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाला थेट जवानांपर्यंत पोहोचणार!

 

अमळनेर:भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन या पवित्र सणांचे औचित्य साधून अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी एक अत्यंत अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांमधील तब्बल १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या त्यागावर व धैर्यावर आधारित निबंध आणि पत्रलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आपले जवान सीमेवर अत्यंत बिकट परिस्थितीत अहोरात्र जागून देशाचे संरक्षण कसे करतात, त्यांच्या या त्यागामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या लेखणीतून पाझरला देशप्रेमाचा सोहळा

या निबंध व पत्रलेखन स्पर्धेत अमळनेर शहरातील कन्या शाळा, साने गुरुजी हायस्कूल, जी. एस. हायस्कूल आणि के. डी. गायकवाड हायस्कूल या शाळांमधील इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भाग घेतला. जवानांच्या संघर्षाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या. “तुमच्यामुळेच आमचा प्रत्येक दिवस सुरक्षित आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

रक्षाबंधन व १५ ऑगस्टलाच सैनिकांना मिळणार विद्यार्थ्यांची ही अनोखी भेट!

विद्यार्थ्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने लिहिलेले हे सर्व निबंध आणि भावुक संदेश रक्षाबंधन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) थेट सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. “एक भाऊ-बहीण म्हणून आम्ही पाठवलेली ही छोटीशी भेट” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हे संदेश लिहिले आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना स्वातंत्र्यदिनी आणि रक्षाबंधनालाच आपल्या देशातील तरुण पिढीचे हे प्रेम व पाठिंबा मिळाल्याने त्यांचे मनोबल नक्कीच द्विगुणित होईल.

आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार

 

अमळनेर : विश्व हिंदू परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अमळनेर येथील डॉ. संजय शाह यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मितेश कामदार यांची जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर संघटनेने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या कार्याचा अनुभव, संघटनात्मक क्षमता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीचे अमळनेर शहर व परिसरातील विश्व हिंदू परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या नियुक्तीमुळे अमळनेरच्या सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान

 

मुडी, ता. अमळनेर येथील सुपुत्र तथा मुंबई एटीएसच्या विशेष पथकातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी श्री. जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांना भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे ‘विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले.

आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, उल्लेखनीय कामगिरी आणि पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट भूमिकेची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे मुडी गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्याचा आणि मुंबई एटीएसचा गौरव वाढला आहे.

श्री. जितेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या कर्तृत्वातून अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 

पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलमध्ये होणार शस्त्रक्रिया; अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलच्या रुग्णांचा समावेश

अमळनेर : सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६ रुग्ण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. विजय बामणे, डॉ. सुधीर फडतरे, डॉ. मोहसीन शेख, तसेच चोपडा येथील डॉ. राहुल चौधरी व भूपेंद्र वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. मंदिराचे सेवेकरी मनोहर तायडे, कैलास महाजन, प्रमोद पाटील, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील यांच्यासह सेवेकऱ्यांनी शिबिर यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.

दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शिबीर

गरजू रुग्णांना नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे आयोजित करण्यात येते. परिसरातील गरजू नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

ध्वजवंदनासह राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर

अमळनेर : पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, देशभक्तीपर रांगोळ्या तसेच विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच देशभक्तीपर संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्या तसेच आकर्षक फुलांच्या पाकळ्यांनी विविध कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणा, गीतांचे सूर आणि विविध वेशभूषांमुळे वातावरणात उत्साह संचारला होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचा सन्मान केला. यावेळी अध्यक्षीय भाषणातून जे. एस. देवरे यांनी युवा पिढीला देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले देशकर्तव्य, दायित्व आणि निस्सीम देशभक्ती कृतीतून व्यक्त करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन व मृदासंवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमाला रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष श्री. महेश पाटील तसेच समस्त कार्यकारी संचालक मंडळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेने रंगत

ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हाऊसनिहाय राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जुनी व नवी देशभक्तीपर, प्रेरणादायी तसेच राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारी गीते सामूहिक स्वरूपात सादर केली. स्पर्धेसाठी लहान व मोठ्या विद्यार्थ्यांचे असे दोन गट करण्यात आले होते.

लहान गट :

🥇 विजेता – ब्ल्यू हाऊस

🥈 उपविजेता – रेड हाऊस

मोठा गट :

🥇 विजेता – येल्लो हाऊस

🥈 उपविजेता – रेड हाऊस

या स्पर्धेसाठी ज्येष्ठ संगीतकार, गायक व संगीतविशारद श्री. शरद सोनवणे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना उपहारस्वरूप टॉफी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आफरीन शेख मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, राजश्री पाटील, रूपाली पाटील, योगिनी ओवे, व्ही. जी. बोरोले, भावना चौधरी, व्ही.एस. अमृतकर, श्वेता कलंत्री, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी, योगिषा महाजन, सविता पारधी, कविता चौधरी तसेच समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्ती, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला.

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

 

जळगाव, दि. १५ ऑगस्ट : वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. गुलाबराव बाविस्कर साहेब होते. तसेच कार्यक्रमास बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँक अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बँकिंग व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढण्यास मोलाची मदत झाली.