ब्रेकिंग
शिक्षक फ्रेंडली’ झाल्याने विद्यार्थ्यांमधील शिस्त व आदर कमी झाला : कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्काराने १८ ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान

 

जळगाव प्रतिनिधी : “कायद्यामुळे शिक्षक ‘फ्रेंडली’ झाल्याने विद्यार्थ्यांमधील शिस्त, शिक्षकांविषयीचा आदर आणि शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा कमी झाली आहे. मात्र, अभ्यासक्रमाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी झाले आहे,” असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.

संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सूर्यजीवनी अभ्यासिकेच्या सभागृहात २४ सप्टेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी विचारपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव प्रकाश बारी, सहखजिनदार उल्हास चौधरी आणि जनसंपर्क अधिकारी कैलास सोनार उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मानपत्र देऊन मंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन स्वाती अहिरराव यांनी केले.

१८ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

‘संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे सन्मानार्थी म्हणून अलका पितृभक्त, हरिश्चंद्र सोनवणे, आधार बाजीराव सपकाळे, बाळू पाटील, शिरीष सोनार, बापू साळुंखे, विजय सुपडू लुल्हे, भास्कर पाटील, अविनाश कुमावत, शालीग्राम नामदेव भिरुड, सुहासिनी सखाराम खाडीलकर, पंडित तायडे, प्रा. धनंजय गुजराथी, आशा कांडेलकर, जानकीराम सपकाळे, आशा ठाकूर, शरयू बोंडे व मंजुषा सोनार यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच मंडळाच्या बोधचिन्हासह उद्दिष्टे असलेले किचेन असे होते. पुरस्कारार्थी मंजुषा सोनार, हरिश्चंद्र सोनवणे व आशा ठाकूर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

यावेळी उल्हास चौधरी यांनी मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे विद्यार्थ्यांना रेडिमेड ज्ञान सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानलालसेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात सुनील जाधव यांनी निवृत्त शिक्षकांनी निवृत्तीनंतरही समाजोपयोगी व विधायक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सुशिक्षित समाजातही वाईट चालीरीती व अंधश्रद्धा वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

संस्थेचे सचिव प्रकाश बारी यांनी आभार प्रदर्शन केले, तर जनसंपर्क अधिकारी कैलास सोनार यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकुमार अहिरराव व स्वाती अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्था संचालक उल्हास चौधरी, सहसचिव दीपक तांबोळी, सुनील नेमाडे, विवेक अमृतकर, इंदिरा जाधव, यशवंत चिरमाडे यांच्यासह समस्त संचालक मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास पुरस्कारार्थी, त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट तसेच शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *