NEET पेपरफुटी प्रकरणाचा अमळनेर PTA तर्फे तीव्र निषेध विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या वतीने सोमवार, दि. 18 मे रोजी प्रांत कार्यालय परिसरात शांततामय पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अमळनेरचे प्रांताधिकारी मा. श्री. मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या आणि गुणवत्ताधारित शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकाराबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर PTA चे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब मगर यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. श्री. संदीप घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांच्या कष्टाशी व भविष्याशी होणारी तडजोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असे ठाम मत व्यक्त केले. तसेच पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर व जलद कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य तसेच श्री. सुधीर टाकणे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली. यावेळी NEET अन्यायग्रस्त विद्यार्थीनी लावण्या सातपुते व विद्यार्थी अजिंक्य पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, अन्याय आणि स्पर्धा परीक्षांबाबत निर्माण झालेली असुरक्षितता मांडली.

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही”, “पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मात्र संपूर्ण आंदोलन शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
या आंदोलनात श्री. किरण माळी, श्री. राकेश बडगुजर, सौ. सुरश्री वैद्य, श्री. ज्ञानेश्वर मराठे, श्री. नागराज माळी, श्री. हर्षल बडगुजर, श्री. स्वर्णदीप राजपूत, श्री. संदीप महाजन, श्री. सुधीर टाकणे, श्री. ज्ञानेश्वर साळुंखे, श्री. अविनाश कोळी, श्री. सुनील पाटील आदी PTA क्लास संचालक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

