अमळनेरात श्वान चावा प्रतिबंधासाठी जनजागृतीचा जागर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन, रोटरी क्लब व सामाजिक संस्थांचा संयुक्त उपक्रम

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथे श्वान व कुत्रा चावा प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी रोटरी हॉलमध्ये प्रभावी जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ अमळनेर, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी होते. यावेळी आशिष चौधरी, प्रतीक जैन, पशुवैद्यक डॉ. राजेंद्र धनगर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विजयकुमार वाघमारे तसेच आधार संस्थेचे संचालक रेणू प्रसाद उपस्थित होते. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजीत भांडारकर आणि आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी विवेक गोस्वामी यांनी प्रास्ताविकातून श्वान चावा प्रतिबंधासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्वानांचे नियमित लसीकरण, नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि रेबीजपासून बचाव याबाबत माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

पशुवैद्यक डॉ. राजेंद्र धनगर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कुत्रा हा शेतकऱ्यांचा मित्र आणि माणसाचा विश्वासू साथीदार आहे. मात्र कुत्रा चावल्यास रेबीजसारखा गंभीर आजार होऊ शकतो. या आजारावर उपचार मर्यादित असल्याने प्रतिबंधात्मक उपाय आणि तत्काळ वैद्यकीय उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्वान चावा प्रतिबंधावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वयंसेवक सागर कोळी, किर्ती सोनवणे, यामिनी माळी, अनुजा पाटील, सचिन सावळे, प्रद्न्या शिरूडकर, आकाश सैदाने आणि मोहिनी पाटील यांनी पथनाट्यातून जनजागृतीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक संदानशीव यांनी केले तर आभार विवेक गोस्वामी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय कापडे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, समाधान धनगर, मोहिनी धनगर, अश्विनी भदाणे, योगिता पाटील, ऊर्जिता शिसोदे, भावेश मराठे आणि माया जाधव यांनी परिश्रम घेतले.