जनगणना कर्मचाऱ्यास दमदाटी; माजी नगरसेवक सलीम टोपीविरुद्ध गुन्हा दाखल राष्ट्रीय जनगणना कामात अडथळा; प्रशासनाची कठोर भूमिका
अमळनेर | प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याप्रकरणी अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेल्या प्रगणकाला थेट हाकलून लावत जनगणना नोंद करण्यास मज्जाव करण्यात आल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियुक्त प्रगणक दिनेश पालवे हे जनगणना पूर्वतयारीच्या कामासाठी गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी संबंधित घराची माहिती विचारून नोंद प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध करण्यात आला.

“तू यहां क्यों आया? यहां पे पच्चीस साल से कोई सरकारी अधिकारी आया नहीं… चल निकल यहां से… यहां आना नहीं…” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित घराचा क्रमांक टाकू दिला नसून शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
घटनेनंतर प्रगणक दिनेश पालवे यांनी संपूर्ण प्रकाराची नोंद जनगणना नोंदवहीत केली. त्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना अधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ हालचाल करत अमळनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ व ३५२ नुसार एनसीआर क्रमांक ०५२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
“जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया” — गणेश शिंदे
> “भारताची जनगणना हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असून नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक ती माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. अमळनेर नगर परिषदेमार्फत जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. नियुक्त प्रगणक श्री. दिनेश पालवे हे गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले असता त्यांना सहकार्य करण्यात आले नाही, तसेच त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.
> शासकीय व राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करून प्रगणक व पर्यवेक्षकांशी सौजन्याने वागावे.”
गणेश शिंदे
जनगणना अधिकारी तथा मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद


