ब्रेकिंग
माय मराठी’च्या गजरात अभिजात भाषा दिन उत्साहात

 

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम येथे ‘मराठी अभिजात भाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. वाङ्मय समिती व आनंददायी शनिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजय अहिरे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र पाटील यांनी ‘मराठी मायबोली’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मराठी भाषेचे संवर्धन व संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यवेक्षक अशोक तायडे यांनी मायबोली व बोलीभाषेचे महत्त्व विविध उदाहरणांतून सांगितले.

अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे होत्या. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि मराठी वाचन-संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्याची गरज स्पष्ट केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘माय मराठी’ कवितेचे सामूहिक सादरीकरण केले.

वाङ्मय समितीप्रमुख प्रज्ञा देशमुख, आनंददायी शनिवार प्रमुख माया देशमुख व मीनल पवार यांनी विद्यालयातील ग्रंथालयातील विविध लेखकांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *