ब्रेकिंग
भडगाव महाविद्यालयात अग्निवीर पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

 

भडगाव (प्रतिनिधी) : येथील र. ना. देशमुख महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय अग्निवीर पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाला. दि. २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षणासह सैनिकी शिस्त, आत्मसंरक्षण आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी भडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब विनय जकातदार व अरुण पाटील उपस्थित होते. पहिल्या दिवशी जळगाव पोलिस दलातील स्वप्नील परदेशी यांनी अग्निवीर भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गैरसमजांवर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी विद्यार्थी विकास सहायक अधिकारी डॉ. देवेंद्र मस्की व प्रा. अर्चना टेमकर यांनी कवायत प्रशिक्षण दिले. तिसऱ्या दिवशी भडगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष देविदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले.

चौथ्या दिवशी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व जळगाव सायबर सेलचे पोलिस निरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी विद्यार्थ्यांना मैदानी प्रशिक्षण दिले. तसेच दृकश्राव्य माध्यमातून मोबाईल सुरक्षेबाबत व सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी विलास शिंपी व अबरार शेख यांनी ज्युडो-कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.

समारोपाच्या दिवशी माजी विद्यार्थी व आदर्श कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक रवींद्र महाजन यांनी लेझीम व डंबेल्सचे प्रशिक्षण दिले. समारोप समारंभ संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब विनय जकातदार व प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते.

यावेळी अबरार शेख व रवींद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांसमोर लेझीम व ज्युडो-कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय भैसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश तांदळे यांनी, तर आभार डॉ. देवेंद्र मस्की यांनी मानले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था प्रा. अर्चना टेमकर यांनी केली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. ज्योती नन्नवरे, डॉ. चित्रा पाटील, प्रवीण तडवी, रवी पाटील, विशाल महाजन, अनामिका ब्राह्मणे, आरती सपकाळे, तृप्ती बाविस्कर, भाग्यश्री पवार व आरती फासगे यांनी सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *