मुंबई : १९४५ साली महात्मा गांधी यांच्या शिष्या डॉक्टर सुशिला नय्यन यांनी सेवाग्राम येथे गोरगरिबांसाठी कस्तुरबा रुग्णालय सुरु केले होते. . एक हजार खाटा असणाऱ्या या रुग्णालयात दरवर्षी असंख्य रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.याच रुग्णालयाला नाशिकचे माजी जिल्हाधिकारी आणि ३४ वर्षे सनदी अधिकारी म्हणून सेवा बजावीत निवृत्त झालेल्या महेश झगडे यांनी ११ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. १२ ऑगस्ट २००२ ते २९ मे २००६ या कालावधीत ते नाशिकला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
रविवारी त्यांनी 11 लाख रुपयांचा चेक सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाला सुपूर्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत कस्तुरबा रुग्णालयाला झगडे यांनी ही मदत पोहोचवली. महेश झगडे 34 वर्ष प्रदीर्घ काळाच्या नोकरीनंतर निवृत्त झाले. पण सुप्रीम कोर्टाने त्यांची नियुक्ती मागासवर्गासाठी समर्पित आयोगात केली होती. या आयोगाचे सदस्य असलेल्या झगडे यांनी सुरुवातीस कोणतंही मानधन न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांनी आपल्याला मिळणारं मानधन दान करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी 11 लाख 11 हजार रुपयांची मदत सेवाग्राम येथील रुग्णालयाला दिली.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गरजू रुग्णांना मदत करण्याचा विचार निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांच्या मनात घोळत होता. त्यातून त्यांनी आपल्या कामातून मिळणारी मानधनाची रक्कम त्यांनी रुग्णालयाला दान करण्याचं ठरवलं. महेश झगडे हे बांठिया आयोगाचे सदस्य होते. आएएस अधिकारी म्हणून त्यांनी केलेली कामगिरीदेखील उल्लेखनीय होती. वाहतूक विभागातील दलालांची मक्तेदारी त्यांनी आपल्या कामगिरीने मोडून काढली होती.