राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत दिवाळीनंतर वाढ होणार आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता.
मात्र, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी केला आहे. एकूणच न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. एकूणच माजी मंत्री एकनाथ खडसे हे भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. खडसे यांना चौकशीत जवळपास क्लीनचिट मिळेल अशी खात्री होती, मात्र नव्याने तपास केला जाणार असल्याने खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.