September 15, 2024
शिवराज पाटील यांनी माफी मागितली पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे
Amazon
महाराष्ट्र

शिवराज पाटील यांनी माफी मागितली पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गीतेतील श्रीकृष्णाचा अर्जुनाला संदेश म्हणजे जिहाद असल्याचे केलेले वक्तव्य अत्यंत दुःखदायक असून हिंदू समाज आणि देश कधीही हे विधान सहन करणार नाही. त्यांनी देशाची आणि हिंदू धर्मियांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या विधानामुळे त्यांच्याविषयीचा आदर संपला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अशा मोठ्या पदांवर काम केले. त्या पदांचाही त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी केलेले विधान हिंदू संस्कृती आणि भारताचा अपमान करणारे आहे. हे विधान हिंदू समाज आणि देश कधीही सहन करणार नाही. शिवराज पाटील यांना माफी मागावी लागेल.

त्यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्राद्वारे केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे तसे आवाहन केले. त्याचा विचार करून भाजपाने सहानुभूती म्हणून आपला उमेदवार मागे घेतला. भाजपाने उमेदवार मागे घेईपर्यंत शरद पवार यांच्या आवाहनाचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी नंतर मात्र पळ काढला अशी भाषा सुरू केली. आपले त्यांना आव्हान आहे की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार लढेल आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पळ काढावा लागेल.

शिंदे फडणवीस सरकारने सीबीआयला राज्यात तपासाची सरसकट मोकळीक दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आपल्या भ्रष्टाचारावर कारवाईची भीती वाटत होती व त्यामुळे त्यांनी राज्यात सीबीआयला मनाई केली होती.

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारने दिवाळीसाठी रेशनवर शंभर रुपयात चार वस्तूंचे पॅकेज अवघ्या देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या पॅकेजचे वाटप सुरू झाले आहे. आपण स्वतः पुणे जिल्ह्यात काल काही लाभार्थ्यांना पॅकेज दिली. सहा कोटी लोकांपर्यंत ही किट पोहोचवायची असल्याने काम मोठे आहे व त्यामुळे स्वाभाविकपणे काही अडचणी येत आहेत. परंतु वाटप सुरू झाले आहे व ते पूर्ण होईल, हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या राज्यातील प्रवासात ठिकठिकाणी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आपल्याविरोधात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेले आंदोलन स्वाभाविक आहे, असा टोला त्यांनी हाणला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *