September 16, 2024
कामावरून काढल्याचा राग : डॉक्टरच्या घरी १ कोटीची चोरी करणारे अटकेत
Amazon
क्राईम महाराष्ट्र

कामावरून काढल्याचा राग : डॉक्टरच्या घरी १ कोटीची चोरी करणारे अटकेत


ठाणे : अंबरनाथमधील डॉक्टर उषा आणि हरीश लापसिया यांचं कानसई दत्तमंदिराजवळ उषा नर्सिंग होम हे हॉस्पिटल आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आधी तळमजल्यावरील पेशंट आणि नर्स यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर लापसिया यांच्या घरात घुसून तिथून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम, हिरे असा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल लुटून नेला होता.

जाताना हे दरोडेखोर सीसीटीव्हीचा डिव्हीआरही घेऊन गेल्याने हे काम ओळखीतल्याच कुणाचं तरी असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र सर्व अंगांनी तपास करूनही 3 महिने शिवाजीनगर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. यामुळं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हर्षल राजपूत यांच्याकडे तपासाची सूत्रं देण्यात आली. राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांनी आरोपींचा मग काढत त्यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये डॉक्टर लापसिया यांच्याकडेच पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेनं हा सगळा कट रचल्याचं समोर आलं.ज्योती सालेकर ही महिला पूर्वी लापसिया यांच्याकडे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती. मात्र ती रुग्णांकडून परस्पर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्यानं डॉक्टर लापसिया यांनी तिला कामावरून काढून टाकलं होतं.

याचाच राग काढण्यासाठी ज्योतीने तिच्या ओळखीच्या चेतन दुधाने, हरीश घाडगे, अक्षय जाधव, कुणाल चौधरी, दीपक वाघमारे, तुषार उर्फ बाळा सोळसे यांना सोबत घेत हा दरोड्याचा कट रचला आणि दरोडा टाकला.दरोडा टाकल्यानंतर जणू काही झालंच नसल्याच्या अविर्भावात हे सगळे वावरत होते. त्यात 3 महिने होऊनही पोलीस आपल्यापर्यंत न आल्यानं आता दरोडा पचवल्याच्या आनंदात हे सगळे होते. मात्र त्याचवेळी त्यांच्यातल्याच एकाने दारू पिऊन मित्राला या दरोड्याबाबत सांगितले. हे किस्से थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याने सगळे थेट गजाआड पोहोचले. या सर्वांकडून चोरीचं सोनं विकत घेणारे बाबूसिंग चदाणा आणि गोपाल रावरिया या दोन ज्वेलर्स व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *