कोलकाता : हेरगिरी विभागाच्या बँक फसवणूक विरोधी विभागाने कोलकाता येथील एका सीएवर छापा मारत त्याच्याकडून 8.15 कोटी रोकडसह दोन बँक खाती सील केली आहेत. सील करण्यात आलेल्या बँक अकाऊंटमध्ये 20 कोटी जमा करण्यात आले होते. कोलकातातील सीए शैलेश पांडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. छापेमारीनंतर शैलेश पांडे आणि त्याचा भाऊ अरविंद पांडे यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एका राष्ट्रीयकृत बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पांडे यांच्या कॅनरा बँकेतील अकाऊंटमध्ये संशयास्पद व्यवहार पाहिल्यानंतर बँकेने पांडे यांच्या खात्यावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली.
याबाबत बँकेतर्फे कोलकात्याच्या लालबाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांच्या बँक फसवणूक विरोधी विभागाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पांडे यांच्या हावडा स्थित घरावर आणि कारमध्ये छापेमारी करण्यात आली. यावेळी कारमधून 2 कोटी 20 लाख रुपयांच्या रोकडसह हिरे, जवाहिर जप्त करण्यात आले. तर घरावर मारलेल्या छाप्यात 5.95 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
पोलिसांनी पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. यावेळी रोख रकमेसह दागिने जप्त केले. तसेच फ्लॅटमधून दोन लॅपटॉप, एक टॅबलेट आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते खोलले आणि या खात्यात संशयास्पद व्यवहार केला. मुख्य आरोपी शैलेश पांडेच्या अटकेसाठी पोलीस आता संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत.