राज्यभर गाजलेल्या श्रीरामपूर येथील लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना आता मोक्का लावण्यात आला. सहा आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली गेलीय. श्रीरामपूर शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला त्यामुळे आळा बसणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर धर्मांतर आणि वेश्या व्यवसायाला लावल्याचं प्रकरण ऑगस्टमध्ये समोर आलं होतं.
पोलिसांनी कारवाई करत आणखी चार मुलींची सुटका केली. सहा आरोपींना गजाआड केले होते. अटकेत असलेल्या मुख्य आरोपी इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्यासह सहा जणांवर विविध प्रकारचे पन्नास गुन्हे दाखल आहेत.
मुलींचे अपहरण करणे, सामूहिक अत्याचार करणे, धर्मांतर करणे, मुलींची विक्री करून वेश्या व्यवसायाला भाग पाडणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोक्का लावण्याचा प्रस्ताव श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी नाशिक विभागीय आयुक्त बी.जी. शेखर यांच्याकडे पाठवला होता.
संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाली. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे, सुमन मधुकर पगारे, सचिन मधुकर पगारे, बाबासाहेब एकनाथ चेंडवाल व मिनाबाई रूपचंद मुसावत या सहा जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. अशी माहिती संदीप मिटके यांनी दिली.