September 13, 2024
उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस –राष्ट्रवादीला मत : चंद्रशेखर बावनकुळे
Amazon
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस –राष्ट्रवादीला मत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते घरोघर जाऊन याबद्दल जागृती करतील, असे मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले.ते मुंबई येथे प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व नवनियुक्त भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थित होते.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षात काँग्रेसचे विचार स्वीकारण्यासोबतच काँग्रेस वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असताना त्या पक्षाला साथ दिली. आता त्यांच्या गटाने राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांची सेना बाळासाहेबांच्या विचारांपासून फार दूर गेल्याचे आम्ही घरोघर जाऊन मतदारांना सांगू.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बारामती मतदारसंघातही चमत्कार झालेला दिसेल.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आमदार नाराज असल्याचा केलेला आरोप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नसल्याचे केलेले भाकित याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी मा. बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असतानाही ते म्हणत होते की, भाजपाचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांमध्ये काय चालले आहे ते आधी पहावे. त्यांच्या पक्षातून भाजपामध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील तेव्हा त्यांना कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *