September 16, 2024
विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुक्तपणे वावरू द्या : जेष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी
Amazon
शैक्षणिक

विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुक्तपणे वावरू द्या : जेष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी


सीएचएमई चा गुणगौरव सोहळा उत्साहात


नाशिकः विद्यार्थ्यांवर कुटूंबातील सदस्यांनी आपल्या अपेक्षांचे ओझे कधीही लादता कामा नये, उलट त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव कसा मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावे, त्यांना मुक्तपणे वावरू द्यावे. त्यातूनच हवी असलेली संकल्पपुर्ती होण्यास निश्चित मदत होईल, अशी सूचना जेष्ठ शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान सल्लागार डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी केली.


सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीचा गुणगौरव सोहळा काल सायंकाळी भोसला स्कूलमधील डॉ.मुंजे सभागृहात झाला. त्यावेळी डॉ.कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके हे प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर,नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे,कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, डॉ.मुंजे विशेष पुस्तिकेचे लेखक नेत्ररोगतज्ञ डॉ.धनंजय देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी,सन्मानीय सभासद उपस्थित होते.


डॉ.कुलकर्णी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलामांबरोबर काम करतांनाचे तसेच आपल्या जीवनात आलेले इतर अनुभव शिक्षक, विद्यार्थी,पालकांसमोर मांडले. ते म्हणाले, धर्मवीर डॉ.मुंजेंनी सैनिकी शिक्षणाचा दृरदृष्टीकोन ठेवून संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार,प्रसार आणि प्रबोधनाचे काम आपण सारेजण करत आहात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम हे सर्वप्रथम आई वडील आणि त्यानंतर शिक्षक करतात. ते अधिक प्रभावी होण्यासाठी हे घटक आपआपल्यापरिने प्रयत्न करीत असतात,पण विशेषतः आईवडिल आपल्या पाल्यांकडून अमूकच शिक्षण पूर्ण करावे,पदवी घ्यावी,अमूक पद प्राप्त करावे असे बंधने त्यावर लादतात, त्यामुळे स्वभाविकच आपल्या स्वप्नांना मुरड घालत पाल्याला नाईलाजास्तव पालकांच्या त्या इच्छापूर्ण कराव्या लागतात, याचा त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला मोठा फटका बसतो,असे ते म्हणाले, यावेळी आगामी काळात काही उपक्रम संयुक्तपणे राबविण्याची सूचना त्यांनी केली.


प्रा.फडके म्हणाले अग्रतः चतुरो वेदा: पृष्ठतः सशरं धनु! इदं ब्राम्हं इदं क्षात्रं शापादपि शरादपि! हे ब्रिद वाक्य घेऊन कार्याचा सैनिकी शिक्षणाचा विस्तार करणारे संस्थापक डॉ.बा.शि.मुंजे हे नागपुरकर असतांनाही त्यांनी नाशिकमध्ये हे कार्य उभे केले. नाशिकच्या जडघडणीत बाहेरील व्यक्तीमत्वांचा विशेष सहभाग राहिला हे आपल्याला विसरता येणार नाही. शिक्षणाचे स्वरूप बदलत असल्याने विद्यार्थी सर्वचबाबतीत पारंगत,हुशार होईल अशा पध्दतीने शिक्षण द्यायला हवे, बदलत्या शिक्षणामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगत त्यांनी संस्थेत विविध पदावर कार्यरत असतांना आलेल्या अनुभव,प्रसंगांच्या स्मृतींना उजाळा दिला.


यावेळी डॉ.देशमुख यांनी डॉ.मुंजे पुस्तिकेतील नेत्रचिकित्सेबद्दल माहिती देत मुंजेनी त्या काळी वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी,अध्यपक,संशोधकांसाठी संस्कृतमध्ये अशापध्दतीचे पुस्तकाद्वारे लिखान करत विचार मांडला असे सांगितले. सुरवातीला प्रमुख पाहुण्यांनी प्रांगणात संस्थापक डॉ.मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत वृक्षारोपण केले. सीएमए हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सौ.अमृता राव यांनी पद्य म्हटले, यावेळी मुंजेच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली.प्रा.संजय साळवे यांनी आभार मानले, वंदेमातरम् ने सोहळ्याची सांगता झाली.



विद्यार्थी,शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप


शिक्षण,कला,क्रीडा,सांस्कृतिक,संशोधन क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विविध वर्गातील विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. संस्थेतर्फे डॉ.कुलकर्णी,प्रा.फडके,डॉ.देशमुख यांना रामाच्या प्रतिमेचे छायाचित्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *