November 20, 2024
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशकात चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Amazon
महाराष्ट्र

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशकात चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुस्तकं ही समाज घडविण्याचे अतिशय मौलिक काम करतात – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.६ मे :- लेखकांना लेखक म्हणून पुढे आणण्याचे काम प्रकाशक करतात. अख्खं जग आपल्याला पुस्तकात सापडते. हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा अतिशय महत्वाचा दुवा असून पुस्तकं ही समाज घडविण्याचे अतिशय मौलिक काम करतात असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर, प्रा.मिलिंद जोशी, रवींद्र गुर्जर, राजीव बर्वे, विलास पोतदार, वसंत खैरनार, सुभाष सबनीस, शिरीष चिटणीस, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह साहित्यिक, लेखक व प्रकाशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना छगन भुजबळ म्हणाले की, प्रभू रामचंद्रासाठी जशी नाशिकची भूमी प्रसिद्ध आहे तशी ही भूमी ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. विद्वान, लेखक, विचारवंत यांची परंपरा नाशिक शहराला लाभली असून कुसुमाग्रज, कानेटकरानी मराठी साहित्य विश्वाला वेगळ्या उंचीवर नेले असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, साहित्यातून समाजाची सत्य परिस्थितीत समाजासमोर येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचाल तर वाचाल असं म्हटलं आहे. ते अतिशय खरं असून वाचन करण अतिशय महत्वाचे आहे. महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात समाजाच्या विरुद्ध जाणारी जी मत धाडसीपणे मांडली ती गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड,तृतीयरत्न या सारख्या पुस्तकांतून पुढे आली. सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके आणि साहित्य सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पुस्तके आता ऑडिओ स्वरुपात उपलब्ध झाली आहे.रोज या ऑडिओ बुक आपण दैनंदिन ऐकत असून पुस्तकांचं बदललेल्या या स्वरूपामुळे प्रिंटिंग पुस्तकांचं काय होईल असा प्रश्न पडतो. परंतु जसे टिव्ही माध्यमे विकसित झाली तेव्हा वर्तमानपत्रांचे काय होईल असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वर्तमानपत्रांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तसेच स्थान पुस्तकही कायम ठेवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपर्यंत तीन वेळा नाशिकला झालेले आहे. नुकत्याच सन २०२१ साली झालेल्या भव्य दिव्य साहित्य संमेलनाचा नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याची आठवणही त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. .

ते म्हणाले की, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही संघटना मराठी प्रकाशकांना लेखांना आणि वाचकांना विविध उपक्रमांच्या सहाय्याने जोडण्याचे आणि एकत्रित ठेवण्याचे कार्य गेली अनेक वर्ष करत आहे. लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रकाशक संचाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच विविध उपक्रमांपैकी एक असलेले लेखक प्रकाशक साहित्य संमेलन दरवर्षी घेण्यात येते. त्यांचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघटित होऊन मागण्या पुढे आल्या तर त्या मागण्या मान्य होतात. त्यामुळे संघटित होऊन मागण्या मांडण्यात आल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या.

पुस्तकांमुळे जेलच्या वातावरणातून तरलो
सध्याच्या काळात वाचन थोड कमी झालं होतं मात्र मायबाप सरकारच्या कृपेमुळे अडीच वर्षे अनेक पुस्तके वाचायची संधी मिळाली.माझ्या अडीच वर्षांच्या अडचणीच्या कालावधीत पुस्तकांनी मला तारून नेलं असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *