सातारा : राज्यात सर्वत्रच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून साताऱ्यात ही कडाक्याच्या उन्हाचे चटके बसू लागले आहेत. परिणामी जंगल भागात असलेली नैसर्गिक पाणवठे आटू लागले आहेत. त्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करताना अनेकदा जंगली प्राण्यांचे वाहनांच्या धडकेत अपघात होत आहेत हे रोखण्यासाठी आणि जंगलातच प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी साताऱ्यातील प्राणी मित्र पुढे सरसावले असून वन विभागाच्या मदतीने या प्राणी मित्रांनी सातारा शहरालगत असलेल्या जंगल भागात कृत्रिम पाणवठे तयार करून या पाणवठ्यात दर दोन दिवसांनी पाणी भरण्याचे काम सुरू केले आहे. प्राणी मित्रांनी उभारलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर अनेक प्राणी पक्षी आनंदाने पाणी पिताना देखील दिसत असल्याने पाण्याच्या भटकंतीसाठी सातारा शहराच्या दिशेने येणाऱ्या प्राण्यांचे अपघात कमी होतील अशी भावना या प्राणी मित्रांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.