नाशिक : गुजरातमधून (gujrat) महाराष्ट्र (maharastra) राज्याच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र परिपूर्ण असतानादेखील आरटीओच्या (rto) खाजगी पंटरने ट्रक चालकाकडून 500 रुपयांची लाच स्वीकारली तसेच मोटार वाहन निरीक्षकाने त्याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी नवापूर पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
यातील तक्रारदार हे ट्रक चालक आहेत. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे परिपूर्ण आहेत. तरीही आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी गुजरातमधून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी नवापूर तालुक्यातील बेडकी येथील आरटीओ चेकपोस्टवर त्यांच्याकडून खाजगी पंटर विजय मगन माऊची (वय 40) याने ५०० रुपयांची लाच स्वीकारली.
त्याला मोटार वाहन निरीक्षक महेश हिरालाल काळे (वय 38, रा.नाशिक) याने प्रोत्साहन दिले. म्हणून खाजगी पंटर माऊची व मोटार वाहन निरीक्षक महेश काळे यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांच्या पथकाने केली. त्यांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे , वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.