September 7, 2024
गेल्या २४ तासात टर्की-सीरियामध्ये तीन मोठे भूकंप
Amazon
आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या भारत

गेल्या २४ तासात टर्की-सीरियामध्ये तीन मोठे भूकंप

नवी दिल्ली-टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात ३८०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्य सुरू असून भारतातूनही NDRF च्या दोन टीम टर्कीला रवाना झाल्या आहेत.

सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.दरम्यान, दोन भूकंपाचे धक्का बसल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा टर्कीत भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ०२२ जणांचा शोध घेण्यात आला असून ७ हजार ८४० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच तीन लाखांपेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, भूकंपामुळे टर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. भारतही टर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने NDRF च्या टीम टर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी रात्री NDRF च्या टीम टर्कीसाठी रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *