सिल्लोड, तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे व अन्वी येथील गाढवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई , जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तसेच उबाळे कुटुंबासह अनवी येथील आत्महत्याग्रस्त गाढवे यांच्या वारसाला शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते देण्यात आला.
घरातील कर्ता गेल्याने दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याने पीडित कुटुंबाला धीर मिळालाच शिवाय काही अंशी दुःखातून देखील पीडित कुटुंबाला सावरण्यासाठी मदत झाली.
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबासोबत सहानुभूती पूर्वक संवाद साधला. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घरकुल आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देवू असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. प्रत्येक संकटावर मार्ग आहे. संकटे येतात , जातात मात्र आत्महत्या पर्याय नाही. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.