अमळनेर तालुका निवृत्त सेवा संघाची ४४ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांसह पेन्शनच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या अमळनेर तालुका शाखेची ४४ वी वार्षिक सभा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मेघ नगरी, अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा नाशिक विभागीय उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे होते.
सभेस निरीक्षक म्हणून धनराज हरी पाटील उपस्थित होते. त्यांनी अहवाल सादरीकरणादरम्यान अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन अदा करण्यात यावी, तसेच विविध प्रकारची थकीत देयके व बिले दोन महिन्यांच्या आत अदा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तालुका कार्यकारिणीच्या वतीने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही देण्यात आला.
काल्पनिक वेतनवाढीच्या संदर्भात जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांमध्ये ३,३८६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निकाल लागल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने वरिष्ठ पातळीवरून प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले असून, साधारण दीड महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रश्नासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी म्हणून निर्धारित नमुन्यातील माहितीपत्रक, स्वाक्षरीसह अर्जाच्या दोन प्रती तयार कराव्यात. त्यापैकी एक प्रत तालुका शाखेकडे व दुसरी जिल्हा शाखेकडे सादर करून पोहोच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
सभेदरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यात आला. सभेस उपस्थित सर्वांसाठी श्रीमती भागाबाई चंद्रसिंग पवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
सभेचे सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर तालुकाध्यक्ष एच. मु. पाटील, कार्याध्यक्ष प्र. ल. सांगोळे, चिटणीस भा. सी. खंडेराय, श्रीमती शांताबाई मोरे, वसंतराव पाटील, चिंधू वानखेडे, मनोहर बाविस्कर, देविदास पाटील, सुरेश पाटील, प्रमिला पाटील, मोहन ताळे आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.
