ब्रेकिंग
कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : तालुक्यातील कन्हेरे येथे भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाचे आगमन होताच शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले.

बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या हस्ते विधिवत भूमीमातेचे पूजन करण्यात आले. विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती आणून एकत्रित पूजन केल्याने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक व सामाजिक रंग प्राप्त झाला.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मनोहर तायडे, तसेच मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी स्पष्ट करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध गावांमधून संकलित मातीचे एकत्र पूजन करण्यात आले.

कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे शेती, शेतकरी व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, रायझोबियम व बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध जैविक शेती उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

या अभियानांतर्गत जनजागर रथाने कन्हेरेसह फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री या गावांनाही भेट देत शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागर निर्माण केला. ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती प्रसारित करत, पत्रके वाटप करून आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

भूमीमातेच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test